(रत्नागिरी / वार्ताहर)
टीईटी रद्द करण्याची आणि राज्यातील शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरत असून, या मागण्यांसाठी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतरवर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, रत्नागिरीतर्फे मोठ्या संख्येने शिक्षकांनी सहभाग नोंदवला. संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी या आंदोलनात सक्रिय उपस्थित होते.
देशभरातून हजारो शिक्षकांनी सहभाग घेतलेल्या या लक्षवेधी आंदोलनाचे आवाहन अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने केले होते. रत्नागिरीतून जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप देवळेकर, जिल्हा सरचिटणीस श्री. भालचंद्र घुले, राज्य संयुक्त चिटणीस श्री. प्रवीण काटकर, जिल्हा नेते श्री. रमाकांत शिगवण, जिल्हा उपाध्यक्ष श्री. अजय उपरे, तसेच तालुकाध्यक्ष विजय फंड, दत्तात्रय तोटावर, अजित कांबळे आणि इतर अनेक सदस्य सहभागी झाले होते.
या आंदोलनात देशातील 28 राज्यांतील शिक्षकांनी हजेरी लावली. विविध राज्यांतील शिक्षक आमदार आणि खासदारांनीही उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. टीईटी अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करून योग्य न्याय देण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले.
आंदोलनानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य आक्रोश मोर्चा काढून संसदेला घेराव घालण्याचा इशारा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने दिला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर यांनी दिली.
शासनाच्या परस्परविरोधी धोरणावरही शिक्षकांनी कठोर नाराजी व्यक्त केली. “नियुक्तीनंतर पात्रता परीक्षा शासनाचे इतर कर्मचारी देत नाहीत, मग फक्त शिक्षकांनाच का? टीईटी उत्तीर्ण शिक्षकांना पेन्शन नाही; ज्यांना पेन्शन आहे त्यांनी पुन्हा टीईटी द्या, अन्यथा नोकरी गमवा अशी शासनाची ही दुहेरी भूमिका मान्य नाही,” असा जाहीर निषेध आंदोलनादरम्यान नोंदवण्यात आला.

