(रत्नागिरी/ वार्ताहर)
राष्ट्रीय उद्यानविद्या दिनाचे औचित्य साधून उद्यानविद्या महाविद्यालय, दापोलीच्या RHWE विद्यार्थ्यांच्या ‘कृषिवीर’ ग्रुपतर्फे वायंगणी येथील श्री वायंगणेश्वर क्षेत्रपाल मंदिरात उद्यानविद्याविषयक माहिती केंद्राची स्थापना करण्यात आली. या माहिती केंद्राचे उद्घाटन प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्येचे प्रमुख डॉ. किरण माळशे आणि वायंगणी गावचे पोलीस पाटील नितीन खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय उद्यानविद्या दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना उद्यानविद्येचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासातील महत्त्वपूर्ण वाटा अधोरेखित केला.
या माहिती केंद्रामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (DBSKKV) यांनी विकसित केलेल्या विविध सुधारित वाणांची तसेच उद्यानविद्याविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान आणि सुधारित वाण यांची माहिती शेतकरी व ग्रामस्थांना त्यांच्या परिसरातच सहज उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
गावाच्या संसाधनांचा नकाशा सादर
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सहभागात्मक ग्रामीण मूल्यांकन (PRA) पद्धतीचा वापर करून तयार केलेल्या वायंगणी गावाच्या नकाशाचे ग्रामस्थांसमोर सादरीकरण केले. या नकाशाच्या माध्यमातून गावातील विविध संसाधने, शेती क्षेत्र, जलस्रोत तसेच इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितली.
या उपक्रमामुळे उद्यानविद्येतील आधुनिक तंत्रज्ञान आणि विद्यापीठाच्या संशोधनाची माहिती थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. तसेच विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील शेती, स्थानिक संसाधने आणि ग्रामस्थांच्या गरजा यांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानविद्या दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम ज्ञानविस्तारासोबतच ग्रामीण विकासाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरला.
कार्यक्रमाला विद्यार्थी वरुण सावंत, श्रीरंग भडेकर, योगेश गायकवाड, कौस्तुभ इंदप, अथर्व कांबळे, साहिल भोसले, ओमकार हाके आणि प्रणय भटकर उपस्थित होते.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. डी. शिर्के, डॉ. किरण माळशे, विषयतज्ज्ञ डॉ. आशिष शिगवण तसेच मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. नितेश दळवी, डॉ. थोरात, डॉ. काळे, डॉ. राऊत, डॉ. दोसानी, डॉ. तोरणे आणि डॉ. वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

