(विल्ये / अमित कांबळे)
रत्नागिरी तालुक्यातील तरवळ गावचे सुपुत्र, सुप्रसिद्ध चित्रकार व कला शिक्षक अर्जुन माचिवले यांनी सादर केलेले “सण आला हा कोकणचा” हे शिमगा गीत सध्या कोकणच्या ओठावर आहे. सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या या गीताला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, तरवळ गावातील ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला आहे.
नोकरीसोबतच सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय असलेले अर्जुन माचिवले हे गावातील कलाकारांना सातत्याने प्रोत्साहन देत असतात. त्यांच्या या नव्या उपक्रमामुळे स्थानिक कला आणि परंपरेला व्यासपीठ मिळाले आहे. शिमगा गीत सादर करताना त्यांनी गावातील कलाकार व कर्तृत्ववान व्यक्तींचे फोटो-व्हिडीओतून सन्मानपूर्वक दर्शन घडवले. या माध्यमातून गावातील बंधू-भगिनींना प्रेरणा देण्याचे प्रभावी कार्य घडले आहे.
परंपरागत सण-उत्सवांना नव्या रूपात मांडून जनमानसात पोहोचवण्याचा हा उपक्रम विशेष ठरतो. चित्रकला, अभिनय, ग्रामीण सण-उत्सव किंवा सामाजिक मदत अशा विविध क्षेत्रांत अर्जुन माचिवले अविरत कार्यरत राहून इतरांनाही सहभागी करून घेतात, ही बाब समाधानकारक आहे.
या गीताचे छायाचित्रण आकर्षक झाले आहे. गीतरचनाकार आनंद घवाळी, पोस्टर डिझायनर सागर माचिवले तसेच कोरस देणारे मंगेश कुळ्ये, आनंद घवाळी आणि सचिन गोरीवले यांनी दिलेला सुरेख, प्रभावी कोरस गीताची ताकद वाढवतो. या त्रिमूर्तीच्या कोरसने गीत अधिकच भावस्पर्शी झाले आहे.
रत्नागिरीतील कला प्रेमींकडून ‘सण आला हा कोकणचा’ या शिमगा गीतातील सर्व कलाकारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, कोकणी संस्कृतीचे हे सुरेल दर्शन सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.

