(नाणीज / वार्ताहर)
नाणीज येथील कै. मंजुळा वसंत तोडकर (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने २० मे २०२६ रोजी निधन झाले. निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी समाजाप्रती संवेदनशीलता जपत अत्यंत प्रेरणादायी निर्णय घेत त्यांचे मरणोत्तर देहदान केले. त्यांचा देह रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला.
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून पार पडलेले हे २०६ वे मरणोत्तर देहदान ठरले आहे. समाजात देहदान आणि अवयवदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी दिवंगत मंजुळा तोडकर यांचे पुत्र सुनील वसंत तोडकर, सून सायली सुनील तोडकर तसेच रामानंदाचार्य संप्रदायाच्या वतीने राजन बोडेकर, संदीप नार्वेकर, मुन्ना साळवी, अनिता जाधव आणि तोडकर कुटुंबीय उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागातील डॉ. योगिता कांबळे, रेशम जाधव तसेच पूर्वा तोडकर, भूमी पारकर, प्रियल आडिवरेकर आणि मिथिलेश मुरकर यांनी देहदान प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर कुटुंबीयांना अधिकृत प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या देहदान आणि अवयवदान चळवळीचे विशेष कौतुक केले. रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाला आतापर्यंत पाच देहदान प्राप्त झाले असून महाराष्ट्रातील विविध शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालयांना एकूण २०६ मरणोत्तर देहदान तसेच १६९ अवयवदान यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती त्यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान अत्यंत महत्त्वाचे ठरत असून या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत मिळते, तसेच अवयवदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. समाजात देहदान आणि अवयवदानाबाबत सकारात्मक विचार निर्माण व्हावेत आणि अधिकाधिक नागरिकांनी या समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

