( देवळे / प्रकाश चाळके )
“एकत्रित ग्रामस्थ – समृद्ध गाव” हे ध्येय समोर ठेवून कार्यरत असलेल्या देवळे ग्रामविकास मंडळ, मुंबईची प्रथम त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी परळ येथील द सोशल सर्व्हिस लीग, एन. एम. जोशी विद्या संकुल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेत मागील तीन वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच आर्थिक व्यवहारांना मंजुरी देतानाच मंडळाच्या आगामी सामाजिक, शैक्षणिक व ग्रामविकासाच्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
सभेच्या प्रारंभी मंडळाचे सचिव राकेश गुरव यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले. सभेच्या अध्यक्षपदी संजय काळोखे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर देश, महाराष्ट्र आणि देवळे गावाच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.
त्रैवार्षिक अहवालास सर्वानुमते मंजुरी
मंडळाचे सचिव राकेश गुरव यांनी मागील तीन वर्षांच्या कार्याचा आढावा घेणारा त्रैवार्षिक अहवाल सभेसमोर सादर केला. अहवालाच्या प्रती उपस्थित सभासदांना देण्यात आल्या. मंडळाने सामाजिक, ग्रामविकासात्मक तसेच संस्थात्मक क्षेत्रात केलेल्या विविध कामांबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी विठोबा गार्डी, प्रदीप शिंदे, दिनेश साळवी, घागरे आदींनी मनोगत व्यक्त करून मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. चर्चेनंतर त्रैवार्षिक अहवालास सभेने सर्वानुमते मंजुरी दिली.
मंडळाचे खजिनदार रविंद्र पांचाळ यांनी मागील तीन वर्षांच्या आर्थिक व्यवहारांचा तसेच जमाखर्चाचा सविस्तर आढावा सभेसमोर मांडला. आवश्यक खर्च वजा केल्यानंतर मंडळाकडे सुमारे एक लाख रुपयांचा निधी उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
मंडळाचा आर्थिक पाया अधिक भक्कम करण्यासाठी आगामी काळात कार्यकर्ते आणि सभासदांच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील, असे पांचाळ यांनी सांगितले. आर्थिक व्यवहारातील शिस्तीबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर जमाखर्चासही सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
सभासदांना आर्थिक सहाय्य देण्याच्या योजनेला मान्यता
मंडळाच्या आगामी उपक्रमांवर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. मंडळाचे कायदेशीर सल्लागार अॅड. निलेश सकपाळ यांनी प्रस्तावित योजनांचा स्पष्ट आराखडा तयार करण्याची सूचना केली.
अध्यक्ष संजय काळोखे यांनी मंडळामध्ये सुरू असलेल्या बी.सी.च्या माध्यमातून सभासदांना परस्पर आर्थिक मदत मिळत असून, त्यातून मंडळालाही आर्थिक बळकटी मिळत असल्याचे सांगितले. भविष्यात १० हजार रुपयांच्या भागांच्या माध्यमातून निधी उभारून, नियमानुसार सभासदांना कर्जरूपाने आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.
या प्रस्तावावर सभेत साधक-बाधक चर्चा झाली. विश्वास घाग यांनी कर्जवसुली आणि आर्थिक शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर अध्यक्ष काळोखे यांनी स्पष्टीकरण दिले. विकास परशेट्ये आणि विठोबा गार्डी यांनीही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. चर्चेनंतर लागू नियम आणि आर्थिक शिस्तीचे काटेकोर पालन करण्याच्या अटीवर या योजनेस सभेने सर्वानुमते मान्यता दिली.
नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड
सभेतील महत्त्वाच्या विषयांपैकी एक असलेल्या नवीन कार्यकारिणीची निवडही एकमताने करण्यात आली. मागील अनेक वर्षे सचिवपदाची जबाबदारी सांभाळणारे राकेश गुरव यांनी प्रकृतीच्या कारणास्तव तसेच पुरेसा वेळ देता येत नसल्याने सचिवपदाची जबाबदारी बदलण्याची इच्छा व्यक्त केली. मंडळासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल सभासदांनी त्यांचे कौतुक केले.
यानंतर संजय काळोखे यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. सभेने पुढीलप्रमाणे नवीन कार्यकारिणीची निवड केली.
अध्यक्ष : संजय काळोखे
कार्याध्यक्ष : राकेश गुरव
सचिव : अॅड. निलेश सकपाळ
खजिनदार : रविंद्र पांचाळ
उपाध्यक्ष : बालकृष्ण चव्हाण, आनंद साळवी
सहसचिव : प्रदीप शिंदे, विश्वास घाग, दिनेश साळवी
संघटक सचिव : मनोहर रातांबे, अजय कदम, सौ. गौरी काळोखे
हिशेब तपासनीस : प्रकाश गार्डी
सल्लागार : प्रशांत काळोखे, सचिन देवरुखकर
कार्यकारिणी सदस्य : अनिल साबळे, सौ. सविता लखाटे, अविनाश शिंदे, रविंद्र मुगदार, दीपक काळोखे, विठोबा गार्डी, जितेंद्र साळवी, धीरज पंडित, मंगेश सिदम, मंगेश कदम, संतोष कदम आणि उमेश कदम.
सामाजिक व ग्रामविकासाच्या उपक्रमांना प्राधान्य
सभेत दिनेश साळवी, प्रदीप शिंदे, विश्वास घाग, विठोबा गार्डी, घागरे, विकास परशेट्ये, अनंत साळवी तसेच कायदेशीर सल्लागार अॅड. निलेश सकपाळ यांनी विविध सूचना मांडल्या.
आगामी काळात मंडळाने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात अधिक व्यापक उपक्रम राबवावेत, तसेच सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून कामकाज करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष संजय काळोखे यांनी सर्व सभासदांना विश्वासात घेऊन मंडळाचे कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि संघटित पद्धतीने करण्याचा निर्धार व्यक्त केला.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून देवळे ग्रामविकास मंडळाच्या सामाजिक कार्याला नवी दिशा आणि वेग मिळेल. “एकत्रित ग्रामस्थ – समृद्ध गाव” हे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी मंडळ आगामी काळात अधिक जोमाने कार्य करेल, असा विश्वास सभेच्या समारोपप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

