(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वयाची सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची आर्थिक चिंता दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या ‘आयुष्मान वय वंदना’ योजनेचा आधार मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ६४ हजार १२५ पात्र ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या अतिरिक्त मोफत उपचारांचे (टॉप-अप) आरोग्य संरक्षण उपलब्ध होणार आहे. मात्र, ६ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील केवळ २६ हजार ६४३ ज्येष्ठ नागरिकांनी कार्ड तयार करून घेतले असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.
केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध करून दिले जातात. त्यात आता ७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आयुष्मान वय वंदना’ योजनेद्वारे स्वतंत्र आरोग्य संरक्षणाची भर पडली आहे. एखाद्या कुटुंबाकडे आधीपासून आयुष्मान कार्ड असल्यास त्या कुटुंबातील ७० वर्षे व त्यावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला स्वतंत्र पाच लाख रुपयांचे अतिरिक्त टॉप-अप आरोग्य संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांचा खर्च पेलताना ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांना अंगीकृत रुग्णालयांमधील आरोग्य मित्र, गावातील आशा सेविका, ‘आपले सरकार’ सेवा केंद्र, सीएससी केंद्र तसेच स्थानिक रास्त भाव दुकानदारांच्या माध्यमातून हे कार्ड तयार करून घेता येणार आहे. तसेच beneficiaries.nha.gov.in या संकेतस्थळावर किंवा आयुष्मान मोबाइल अॅपद्वारेही कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत कार्ड तयार करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. उपचाराची गरज भासल्यास याच कार्डच्या माध्यमातून शासनाच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये मोफत उपचारांचा लाभ घेता येणार असल्याने पात्र ज्येष्ठ नागरिकांनी कार्ड काढण्यात टाळाटाळ करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘सत्तरी पार’ केलेल्या प्रत्येक पात्र ज्येष्ठ नागरिकापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून, जिल्ह्यातील उर्वरित लाभार्थ्यांनी तातडीने ‘आयुष्मान वय वंदना’ कार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद रत्नागिरीच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, आरोग्य सभापती विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

