(रत्नागिरी)
जयगडमधील सडेवाडी-सतीमंदिर रस्त्यावर एका प्रौढावर सळीने मारहाण केल्याचा प्रकार घडला असून, या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात विक्रम चंद्रकांत खाडे (रा. सडेवाडी, जयगड) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १६) सकाळी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लीलाधर आत्माराम खाडे (वय ५१) हे मोहन नारायण पिल्लय यांच्यासह त्यांच्या गाडीमधून बांधकाम साहित्य घेऊन कामाच्या ठिकाणी जात होते. दरम्यान, विक्रम खाडे याने दुचाकी आडवी लावून त्यांच्या गाडीचा रस्ता अडवला. त्यानंतर शिवीगाळ करत “तू माझ्या भाच्याला शिवीगाळ का केलीस?” असा जाब विचारत, गाडीतील लोखंडी सळी उचलून लीलाधर खाडे यांच्या कपाळावर मारहाण केली.
या हल्ल्यात लीलाधर खाडे यांना दुखापत झाली असून, त्यांनी तत्काळ जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी विक्रम खाडे याच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरु आहे.