(रत्नागिरी / वार्ताहर)
शहरालगतच्या फगर वठार परिसरात पुन्हा एकदा दरड कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरड कोसळल्यानंतर रस्त्याचा मोठा भाग खचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मुसळधार पाऊस सुरू असताना पुन्हा दरड कोसळल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पहिल्याच पावसात कोसळली होती दरड
फगर वठार परिसरातील याच ठिकाणी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दरड कोसळली होती. त्यावेळी संबंधित यंत्रणेकडून तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, दरड रोखण्यासाठी कायमस्वरूपी संरक्षण भिंत किंवा आवश्यक प्रतिबंधात्मक कामे करण्यात न आल्याने आता पुन्हा त्याच ठिकाणी दरड कोसळून रस्ता खचला आहे.
पुन्हा दरड कोसळल्याने तात्पुरत्या उपाययोजनांचा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. पावसाळ्यापूर्वीच धोकादायक ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
घरांनाही धोका; नागरिकांमध्ये भीती
दरड कोसळल्यामुळे परिसरातील काही घरांनाही धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पाऊस आणखी काही दिवस सुरू राहिल्यास याच भागात पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रत्येक पावसाच्या सरीसोबत जीव मुठीत धरून राहण्याची वेळ फगर वठारमधील नागरिकांवर आली आहे. रात्रीच्या वेळी किंवा मुसळधार पावसात पुन्हा दरड कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
रस्ता वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्गाची व्यवस्था
दरड कोसळून रस्त्याचा मोठा भाग खचल्याने फगर वठारमधील संबंधित मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नागरिक आणि वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी सध्या पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, मुख्य मार्ग बंद झाल्याने परिसरातील दैनंदिन वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असताना केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून प्रश्न सुटणार नाही, अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. प्रशासनाने तातडीने फगर वठार परिसराची पाहणी करून धोकादायक भागाचे सर्वेक्षण करावे आणि दरड रोखण्यासाठी कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी वेळीच प्रतिबंधात्मक कामे न केल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल फगर वठार परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

