(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील जेलरोडजवळील सिग्नल परिसरात मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहनचालकांची अक्षरशः रोजच अग्निपरीक्षा सुरू आहे. या खड्ड्याचा ‘मानाचा दणका’ मात्र कोणालाही चुकत नाही; दुचाकी असो की एसटीमध्ये बसलेले प्रवासी, इथून जाणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाला तो न चुकता प्रसादासारखा मिळतो. काँक्रीटीकरणाची मार्गिका सुरू होण्यापूर्वीच हा धोकादायक खड्डा अपघाताला निमंत्रण देत असून, संबंधित यंत्रणांच्या उदासीनतेवर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या मार्गावर पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून ये-जा करणाऱ्या वाहनांसह बाजारपेठेकडे जाणाऱ्या वाहनांची दिवसभर मोठी वर्दळ असते. या भागात तुकड्यात काँक्रीटीकरणाची मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. सिग्नल परिसर असल्याने वाहने कमी-अधिक वेगाने पुढे सरकत असतात. अशा ठिकाणी रस्त्याच्या मधोमध पडलेला मोठा खड्डा वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. विशेष म्हणजे, खड्डा ज्या ठिकाणी पडला आहे तेथे रस्त्याला किंचित चढ असल्याने वाहन खड्ड्यात गेल्यानंतर बसणारा धक्का अधिक तीव्र जाणवतो. दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांनाही मोठा दणका बसून मणकाच सैल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेकांच्या वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाचे पाणी साचल्यानंतर या खड्ड्याची खोलीच दिसून येत नाही. त्यामुळे अनभिज्ञ वाहनचालक अचानक खड्ड्यात गेल्याने वाहनावरील ताबा सुटण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक असून, मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याहून गंभीर बाब, खड्डा चुकविण्यासाठी पुढील वाहन अचानक वेग कमी करताच मागून येणाऱ्या वाहनांना ब्रेक मारण्याची वेळ येते. त्यामुळे मागून धडक बसण्याच्या घटनांची शक्यता नाकारता येत नाही. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या या चौकात ही परिस्थिती दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनत आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे, या खड्ड्यापासून अवघ्या काही सेकंदांच्या अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. तरीही नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या धोक्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत असून, हा जीवघेणा खड्डा तातडीने भरून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

