(रत्नागिरी / वार्ताहर)
तालुक्यातील वरवडे गावात दिवसभरात तब्बल १५ वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थ आणि व्यापारी अक्षरशः हैराण झाले आहेत. वारंवार जाणाऱ्या विजेमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, छोट्या व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क साधला असता महावितरणच्या संबंधित कार्यालयाचे तसेच कर्मचाऱ्यांचे फोन ‘नॉट रिचेबल’ येत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारपासूनच गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला दर तासाने वीज जात होती. मात्र संध्याकाळनंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली असून दर १५ ते २० मिनिटांनी वीजपुरवठा खंडित होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
या सततच्या वीज खंडितामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, फ्रीजमधील खाद्यपदार्थ खराब होण्याचा धोका निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. इंटरनेट सेवा, ऑनलाईन व्यवहार आणि दैनंदिन कामकाजावरही याचा परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
एका बाजूला ‘विकसित भारत’ आणि डिजिटल सुविधांच्या घोषणा केल्या जात असताना ग्रामीण भागात नागरिकांना मूलभूत वीज सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. वरवडे गावातील या गंभीर समस्येकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

