( सांगली )
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे (ता. आटपाडी) येथील शाखेवर बुधवारी मध्यरात्री भीषण दरोडा पडला. दरोडेखोरांनी बँकेच्या स्ट्राँग रूममधील तब्बल 22 लॉकर फोडून सुमारे 10 किलो सोने आणि 25 किलो चांदी असा कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सोन्या-चांदीच्या वजनाबाबतचा अंदाज तात्पुरता असून, बँकेतून किती रोख रक्कम चोरीला गेली आहे, याची माहिती येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. लॉकरधारकांकडून मिळणाऱ्या यादीच्या आधारे चोरी झालेल्या ऐवजाचे अंतिम मूल्य आणि प्रमाण ठरवले जाणार आहे.
झरे बस स्थानक परिसरात तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीच्या इमारतीत ही बँक शाखा भाड्याने सुरू आहे. दरोडेखोरांनी बँकेच्या पूर्वेकडील बाजूची लोखंडी खिडकी कटरने कापून आत प्रवेश केला. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे, सायरन आणि इंटरनेटच्या वायर कापून सुरक्षा यंत्रणा निष्क्रिय केली. सर्व हालचालींची नोंद असलेला डीव्हीआरही दरोडेखोरांनी सोबत नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हाताचे ठसे राहू नयेत म्हणून त्यांनी हातमोज्यांचा वापर केल्याचेही समोर आले आहे. लॉकर क्रमांक २, ३, ४, ९, ११, १२, १३, १४, १८, १९, २०, २१, २२, २३, २४, २५, २७, २८, २९, ३०, ३१ व ३२ हे गॅस कटरने फोडण्यात आले आहेत.
गुरुवारी सकाळी सुमारे दहा वाजता बँक कर्मचारी कामावर आल्यानंतर दरोड्याची माहिती उघड झाली. त्यानंतर बँक शाखेबाहेर लॉकरधारक आणि ठेवीदारांची मोठी गर्दी झाली. आयुष्यभराची पुंजी चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आटपाडी पोलीस, ठसेतज्ज्ञ, गुन्हे अन्वेषण शाखा आणि श्वानपथकाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
फिर्यादीची माहिती
या प्रकरणी शाखाधिकारी व कॅशिअर हणमंत धोंडिबा गळवे (वय 46) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत 22 लॉकर फोडून सुमारे 9.30 लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरीला गेल्याचा प्राथमिक उल्लेख आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, चोरीचा ऐवज यापेक्षा कितीतरी अधिक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बँकेच्या पाठीमागील खिडकीची काच फुटलेली आणि लोखंडी गज कापलेले आढळले. आतमध्ये साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असून, गॅस कटर, सिलिंडर आणि पाईप घटनास्थळी सापडले आहेत. नामांकित कंपनीचे लॉकर गॅस कटरने फोडून दागिने चोरल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे, कुरुंदवाडी येथील बिरोबा देवस्थानचेही या झरे शाखेत लॉकर असून, भक्तांनी दान केलेले सोने आणि चांदी येथे ठेवण्यात आली होती. ही मौल्यवान देवालयाची संपत्तीही दरोडेखोरांनी लंपास केल्याचे समोर आले आहे.
घटनेची गंभीरता लक्षात घेता घटनास्थळी आम. गोपीचंद पडळकर, बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, पोलीस उपअधीक्षक कल्पना बारवकर तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वाघ यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

