(रत्नागिरी)
तालुक्यातील चांदेराई गावात थंडीपासून बचावासाठी शेकोटीजवळ बसलेल्या एका महिलेच्या अंगावरील कपड्यांना अचानक आग लागल्याने ती गंभीररीत्या भाजली. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
सेजल संतोष सुर्वे (वय ४२, रा. चांदेराई, ता. रत्नागिरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. सकाळच्या वेळी थंडी अधिक असल्याने सदर महिला घराजवळ शेकोटीजवळ बसली होती. यावेळी चुकीने त्यांचा पदर शेकोटीला लागला, यामुळे साडीने पेट घेत त्यांच्या अंगावरील कपड्यांनीही पेट घेतला. काही क्षणातच आग भडकून त्या गंभीर भाजल्या.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यानंतर जखमी महिलेला तत्काळ उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, थंडीच्या दिवसांत शेकोटीचा वापर करताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन व आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

