(सावंतवाडी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने नियोजनबद्ध आणि समन्वित ‘सर्जिकल स्ट्राईक’ राबवत अवैध कारभारावर मोठा घाव घातला. जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट सूचनांनुसार विविध तालुक्यांतील तहसीलदारांनी संयुक्त पथके तयार करून एकाच वेळी अनेक ठिकाणी धडक कारवाया केल्या.
या व्यापक मोहिमेत सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, वैभववाडीचे सूर्यकांत पाटील, कणकवलीच्या दीक्षात देशपांडे, मालवणचे गणेश लव्हे, वेंगुर्ल्याचे ओंकार ओतारी आणि कुडाळचे सचिन पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विविध मार्गांवर काटेकोर नाकाबंदी करत पथकांनी संशयित वाहनांवर नजर ठेवली आणि अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्याचा ठोस प्रयत्न केला. आचरा–कणकवली मार्गावर वैभववाडी पथकाने दोन वाहने ताब्यात घेतली, तर देवलीमार्गे परुळे दिशेने जाणाऱ्या तीन वाहनांवर वेंगुर्ला पथकाने कारवाई केली. कुंभारमाठ येथे कणकवली पथकाने तीन वाहने जप्त केली, तोंडवली परिसरात सावंतवाडी पथकाने तीन वाहनांवर कारवाई केली, तर कुडाळ भागात चार वाहने ताब्यात घेण्यात आली. या समन्वित कारवाईत एकूण १५ वाहने जप्त करण्यात आली असून ती संबंधित तहसील कार्यालयांच्या आवारात ठेवण्यात आली आहेत. संबंधितांवर पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः झाराप परिसराला भेट देत कारवाईचा आढावा घेतला. संपूर्ण मोहिम अत्यंत गोपनीयतेत राबविण्यात आली होती. मध्यरात्रीपासून पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू राहिलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनेकांनी वाहनांतील वाळू रस्त्यातच टाकून पळ काढला, तर काहींच्या बोटी खाडीपात्रातच अडकून पडल्या.
जिल्हाधिकारी धोडमिसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या कारवाईने प्रशासनाच्या कठोर भूमिकेचा स्पष्ट संदेश दिला आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध अशा प्रकारच्या संयुक्त, गुप्त आणि सातत्यपूर्ण कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

