(राजापूर /प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, रविवारी सकाळी हातिवलेनजीक टेम्पो ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारे टेम्पो ट्रॅव्हल्स महामार्गावरील डिव्हायडरवर आदळल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून, जखमींमध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याचे समजते.
रविवारी सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हातिवले येथील हॉटेल शिवानंदसमोर हा अपघात झाला. मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने प्रवास करणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सचा अचानक महामार्गावरील डिव्हायडरला जोरदार धडक झाली. धडकेनंतर वाहनातील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अपघाताची तीव्रता लक्षात येताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. टेम्पो ट्रॅव्हल्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले की अन्य कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. महामार्गावरील वाढती वाहतूक, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढलेली वाहनांची वर्दळ आणि अपघातांची मालिका पाहता वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज या दुर्घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे.


