(जैतापूर / वार्ताहर)
नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचा गंभीर गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत नाटे पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी), रत्नागिरी यांनी संयुक्त कारवाईत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ₹२ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाटे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक २५/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५(अ)) अंतर्गत दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास नाटे पोलीस आणि एलसीबीकडून सुरू होता. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विकास टीपू पवार (वय २३), मूळ रा. निगडी ब्राद्रुक, ता. जत, जि. सांगली (सध्या रा. हुपरी, जि. कोल्हापूर) तसेच संपत बिल्लू पवार (वय २०), मूळ रा. हुबनूर, जि. विजापूर (कर्नाटक), सध्या रा. निगडी ब्राद्रुक, ता. जत, जि. सांगली यांचा समावेश आहे.
पोलीस चौकशीत दोन्ही आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून ₹१ लाख ९१ हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ₹२ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी (लांजा विभाग) सुरेश कदम आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय झगडे, संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, दीपराज पाटील, योगेश नार्वेकर तसेच चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत. घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणून आरोपींना अटक केल्याबद्दल नाटे पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.

