(देवरूख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे येथील खालची घुगवाडी येथे काजूच्या झाडांना पुरण घालत असताना पायाला कुऱ्हाडीचा घाव लागल्याने एका ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली असून, तुकाराम गंगाराम बाईत (वय ६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
देवरूख पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम बाईत हे सोमवारी सकाळी गावठाण परिसरातील स्वतःच्या जमिनीत काजूच्या झाडांना पुरण घालण्यासाठी गेले होते. काम सुरू असताना हातातील कुऱ्हाडीचा घाव चुकून त्यांच्या पायावर बसला. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
जखमी अवस्थेत त्यांना तातडीने देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून जखमेवर टाके घालण्यात आले आणि बँडेज केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, घरी जेवण झाल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मंगळवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुकाराम बाईत यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनामुळे बाईत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, हरपुडे परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.

