(देवरुख / वार्ताहर)
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था, आंबव (देवरुख) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यात मंगळवारी (दि. २८ जुलै) सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. उद्योजकता, संशोधन, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या कराराअंतर्गत विद्यापीठ आणि संस्थेच्या माध्यमातून उद्योजकता विकास, संशोधनाचे व्यापारीकरण, स्टार्टअप इनक्युबेशन, संयुक्त संशोधन प्रकल्प, सल्लागार सेवा तसेच प्राध्यापक व विद्यार्थी विनिमय कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. दोन्ही संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण आणि संशोधनाची प्रभावी संधी उपलब्ध होणार आहे.
या भागीदारीमुळे संस्थेच्या सर्व महाविद्यालयांमध्ये सक्षम स्टार्टअप इकोसिस्टम उभारण्यासाठी इनक्युबेटरला भक्कम पाठबळ मिळणार आहे. तसेच विद्यार्थी, प्राध्यापक आणि नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन, इनक्युबेशन सुविधा, तांत्रिक सहकार्य आणि उद्योजकीय सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पी. यू. शहारे, शिक्षण संचालक डॉ. सतीश एस. नारखेडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय तोरणे, कुलसचिव उमेश चंडिवडे, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. सावर्डेकर, प्रक्षेत्र संचालक डॉ. अरुण माने, विद्यापीठाचे अभियंता राहुल घाडगे, कृषी रसायन व मृदा विज्ञान विभागप्रमुख डॉ. मनीष कस्तुरे तसेच संशोधन उपसंचालक डॉ. वैभव राजेमहाडिक उपस्थित होते.
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रद्युम्न आर. माने, एनआरआयएफ (NRIF) संचालिका ईशानी वाघ, राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत आणि इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवलीचे प्राचार्य डॉ. अमोल बी. खाडे उपस्थित होते.
या सामंजस्य करारामुळे तंत्रज्ञान, कृषी आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना स्वतःचे उद्योग व स्टार्टअप उभारण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होईल. तसेच कोकणातील संशोधन, नवोपक्रम आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री रविंद्र माने यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, कार्याध्यक्षा नेहा माने तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत पुढील काळात या करारांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

