(संगमेश्वर / एजाज पटेल)
नियतीसमोर माणूस किती हतबल असतो, याची हळहळजनक जाणीव फुणगूस गावाने अनुभवली. रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे संतोष फटकरे (वय ४७) यांचे मुंबईत शस्त्रक्रियेदरम्यान निधन झाले. “मी शस्त्रक्रिया करून लवकरच परत येईन, काळजी करू नका,” असे सांगून गेलेले संतोष पुन्हा कधीच परतणार नाहीत, ही वस्तुस्थिती गावकऱ्यांसाठी असह्य ठरली आहे.
हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने संतोष उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले होते. शस्त्रक्रियेनंतर पुन्हा कामावर रुजू होण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. मात्र, शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला निरोप देण्याची संधीही त्यांना मिळाली नाही.
संतोष यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि पाचवीत शिकणारा मुलगा असा परिवार आहे. वर्षभरापूर्वीच आईचे निधन झाल्यानंतर कुटुंब सावरत असताना घरचा कर्ता पुरुष अचानक गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलांच्या शिक्षणाचा आणि भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
रिक्षा चालक म्हणून संतोष फटकरे हे परिश्रमी आणि कुटुंबवत्सल म्हणून ओळखले जात होते. उन्हातान्हात रिक्षा चालवत त्यांनी कुटुंबाचा गाडा सांभाळला. मुलांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे, हीच त्यांची धडपड होती. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबासोबतच गावानेही एक कष्टाळू व्यक्ती गमावली आहे.
निधनाची वार्ता अन् गावातील सर्व कार्यक्रम अर्ध्यावरच बंद!
सोमवारी रात्री गावात आनंदाचे वातावरण होते, काही ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम आणि नमनाचे सूर घुमत होते. पण जशी संतोषच्या निधनाची बातमी गावात धडकली, तसे क्षणार्धात सगळे आनंदाचे रंग विरले. संतापलेल्या आणि हेलावलेल्या ग्रामस्थांनी सुरू असलेले सर्व कार्यक्रम अर्ध्यावरच बंद पाडले. संतोषच्या जाण्याने फुणगूसच्या वाड्या-वस्त्यांवर सुतकी शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळी फुणगूस बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आणि रिक्षा व्यावसायिकांनीही आपली वाहने उभी करून शोक व्यक्त केला.
मित्रपरिवाराची सुन्न प्रतिक्रिया: “आमचा कणा हरपला”
रिक्षा संघटनेचा कोणताही कार्यक्रम असो, वर्धापन दिन असो जोपर्यंत काम फत्ते होत नाही, तोपर्यंत संतोष नावाचा हा ‘वाघ’ शांत बसायचा नाही. संघटनेत हिरिरीने पुढे राहणारा आणि मित्रांच्या हाकेला ओ देणारा हा उमदा सहकारी आज अनंतात विलीन झाला. “कालपर्यंत जो माणूस आमच्यात बसून हसत-खेळत बोलत होता, तो आज नाही,” हे सत्य पचवणे मित्रांना कठीण जात आहे. संतोषची ही ‘अचानक एक्झिट’ केवळ धक्कादायक नाही, तर ती सुन्न करणारी आहे.
संतोष फटकरे यांच्या निधनाने फुणगूस पंचक्रोशी एका कष्टाळू आणि प्रामाणिक व्यक्तीला मुकली आहे. नियतीने संतोषला हिरावून नेले असले, तरी फुणगूसच्या मातीत त्यांच्या कष्टाचा आणि मैत्रीचा सुगंध कायम राहील. आपल्या मित्रांना दिलेला शब्द खोटा ठरला, याचे शल्य त्याचा मित्र परिवाराला आयुष्यभर टोचत राहील.
“लवकरच परत येईन” म्हणणारा शब्द सुन्न करून गेला…
मंगळवारी दुपारी जेव्हा रुग्णवाहिका संतोष फटकरे यांचं पार्थिव घेऊन फुणगूसमध्ये दाखल झाली, तेव्हा गावातील वारंवार वाजणारे रिक्षांचे हॉर्नही आज मूक झाले होते. “मी शस्त्रक्रिया करून लवकरच परत येईन,” हा त्यांनी मित्रांना दिलेला शब्द नियतीने इतका क्रूरपणे खोटा ठरेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. आपल्या कष्टाळू पित्याचा तो शांत देह पाहून त्यांच्या पाचवीतल्या चिमुरड्याने आणि दोन मुलींनी फोडलेला टाहो उपस्थितांच्या काळजाला भिडून गेला. ज्या हातांनी संसाराचा गाडा ओढला, तेच हात आज कायमचे विसावले होते. सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संतोष फटकरे यांच्या निधनाने फुणगूस पंचक्रोशी एका जिद्दी, कष्टाळू आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्वाला मुकली आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबासोबतच गावातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

