( संगमेश्वर / प्रतिनिधी )
कोकण भूमी कृषि पर्यटन सहकारी संस्थेतर्फे गोळवली, ता. संगमेश्वर येथील राई कृषि व निसर्ग पर्यटन केंद्रात फळ प्रक्रिया उद्योग कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेला एकूण ४२ प्रशिक्षणार्थ उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्ष डॉ. मीनल ओक यांनी केले. नंतर संस्थेचे उपाध्यक्ष नंदादीप पालशेतकर यांनी नान्यवर मार्गदर्शक माधव महाजन व सौ दिप्ती लाड त्यांचा परिचय करून दिला.या प्रशिक्षणासाठी अहमदनगर, नाशिक, ठाणे, पुणे, मुंबई, हरिहरेश्वर, दापोली, मंडणगड, रत्नागिरी, सावंतवाडी, म्हापसा (गोवा) आदी विविध ठिकाणांहून प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
प्रशिक्षणार्थीनी आपण करत असलेले उद्योग व्यवसाय शेती याबद्दल सर्वांना माहिती दिली. त्यानंतर अमोल लोध यांनी संस्थेचा परिचय करून दिला. सौ. दीप्ती लाड यांनी काजू बोंड पासून काजू खजूर (कँडी) तयार करणे तसेच काजू सरबत बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. उपस्थितांनी काजू खजूर आणि काजू सरबताचा आस्वाद घेतला. विविध स्थानिक फळांच्या रसा पासून तयार करण्यात येणारा पदार्थ वाईन हे एक पोषक पेय आहे असे सांगून माधव महाजन यांनी त्याची जीवनमूल्येही सांगितली. लहान मुलांपासून, महिला आणि वृद्धांपर्यंत हे पोषक पेय प्रत्येकासाठी किती महत्त्वाचे आहे हेही नमूद केले. कार्यशाळे दरम्यान माधव महाजन यांनी वाईन निर्मितीची प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यामध्ये काजू बोंड आणि अननस या दोन फळांपासून वाईन (पोषक पेय) तयार करण्यात आली. तसेच या उपक्रमासाठी संस्थेचे सदस्य माननीय रामशेठ रेडीज यांनी आपल्या बागेतील काजू बोंड उपलब्ध करून दिली होती. तसेच संस्थेचे सचिव अमोल लोध यांनी आपल्या राई कृषि पर्यटन केंद्रामध्ये उत्तम व्यवस्था केली होती.
उपस्थितांमधून सीए मान. श्रीकांत वैद्य, व अरविंद टिपले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राई कृषि व निसर्ग पर्यटन केंद्राची निवड या प्रशिक्षणासाठी केल्याबद्दल अनेकांनी निसर्गमय अनुभवाचा आनंद शब्दात व्यक्त केला. आदिवासी समाजातील दोन प्रशिक्षणार्थी अहमदनगर आणि अकोल्याहून आले होते. त्यांन आपल्या वन जीवनाचा उत्तम अनुभव कथन केला. प्रशिक्षणार्थीनी निसर्गाच्या सानिध्यात, वृक्षांच्या छायेत, शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसून काजू प्रशिक्षणात काजू भाजी सह भोजनाचा मस्त आस्वाद घेतला. अनेकांनी त्याबद्दल ऋण ही व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. मीनल ओक यांनी सर्वांचे आभार मानून समारोप केला. त्यानंतर श्रीकांतजी वैद्य, माधव महाजन आणि अमोल लोध यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थीना प्रशस्तीपत्रकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला.
फोटो : फळ प्रक्रिया कार्यशाळा सहभागी प्रशिक्षणार्थी परेश व मृणालिनी आरेकर, सीए श्रीकांतजी वैद्य, कृषी तज्ञ माधव महाजन, संस्था सचिव अमोल लोध, अध्यक्ष मीनल ओक

