(संगमेश्वर / एजाज पटेल)
दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.४४ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर येथील संगमेश्वर बाजारपेठ ते रामपेठ मोहल्ला रोडवर सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.
दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ७.१७ वा. गु.र.नं. ०९/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. फिर्यादी म्हणून सतिश शांताराम कोलगे (वय ४०), पोलीस हेड कॉन्स्टेबल/७०७, नेमणूक संगमेश्वर पोलीस ठाणे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शब्बीर अहमद दाऊद आंबेडकर (वय ६५, रा. आंबेड खुर्द, ता. संगमेश्वर) यांनी त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप (क्र. एमएच ०८ ओपी १९७०) ही गाडी संगमेश्वर बाजारपेठ ते रामपेठ मोहल्ला रोडवर सार्वजनिक रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना व वाहनांना धोका निर्माण होईल अशा स्थितीत उभी केली होती. परिणामी काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
सार्वजनिक रस्त्यावर नियमबाह्य पद्धतीने वाहन उभे करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून, अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

