( मुंबई / वृत्तसंस्था )
मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये अन्नाच्या स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी समोर आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी बुधवारी अचानक धाड टाकून तपासणी केली. काही दिवसांपूर्वी कॅन्टीनमधील ताकात माशी आणि त्याआधी कांदा भजीमध्ये प्लास्टिकच्या गोणीचा धागा आढळल्याच्या घटनांची गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, मुंबई महापालिकेनेही कॅन्टीन चालकावर एकूण ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
महापालिका मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. खाद्यपदार्थ उघडे ठेवले जात असल्याने त्यावर माशा बसत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. सोमवारी ताकात माशी आढळल्याची घटना घडली, तर यापूर्वी ३ जुलै रोजी कांदा भजीमध्ये प्लास्टिकच्या गोणीचा धागा आढळल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त झाला होता.
या घटनांचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर FDAच्या अधिकाऱ्यांनी कॅन्टीनमध्ये सुमारे पाच तास सखोल तपासणी केली. तपासादरम्यान स्वयंपाकघर, अन्नसाठा, स्वच्छता व्यवस्था आणि खाद्यपदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेची पाहणी करण्यात आली. मात्र या तपासणीनंतर FDAकडून अंतिम कारवाईबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने आणि कामगार विभागाने स्वतंत्रपणे या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत कॅन्टीन चालकावर प्रत्येकी २५ हजार रुपये, अशा एकूण ५० हजार रुपयांचा दंड आकारला आहे. FDAच्या तपासाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही केईएम रुग्णालयातील कॅन्टीनवर FDAने धाड टाकून परवाना रद्द केला होता. त्यामुळे आता महापालिका मुख्यालयातील कॅन्टीनमधील अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांच्या अंमलबजावणीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाकडून यापुढे अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

