(रत्नागिरी / प्रतिनिधी)
युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल, रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी आपली दमदार कामगिरी नोंदवली आहे. या स्पर्धांमध्ये शाळेतील खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, चिकाटी आणि संघभावनेच्या बळावर अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपदे पटकावून शाळेचा गौरव वाढवला.
विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात आद्या अमित कवितके हिने जिल्हास्तरीय तसेच विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाने शाळेचा अभिमान वाढवला आहे. तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात सिया रेडीज, ऐशनी विचारे, साची जाधव, ऐश्वर्या सावंत आणि उर्वी थूळ यांनी संघभावनेच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावला. जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत आद्या अमित कवितकेने पुन्हा एकदा आपली बहुमुखी प्रतिभा दाखवत प्रथम क्रमांक, तर अर्चित धनंजय कनगुटकर याने तृतीय क्रमांक मिळवला.
रायफल शूटिंग स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात त्रिशा राकेश शितप (पी.पी. पिस्टल) हिने प्रथम क्रमांक, तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात सार्थक विक्रांत देसाई (एअर पिस्टल) याने तृतीय क्रमांक मिळवला. दोघांचीही विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बास्केटबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक, तर १७ वर्षांखालील गटातील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
रोलर स्केटिंग स्पर्धेत ऐश्वर्या सावंत (१४ वर्षांखालील गट) आणि ध्रुव बसणकर व रिझा सुवर्णदुर्गकर (१७ वर्षांखालील गट) यांनी आपल्या वेग आणि संतुलनाच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळवला. मैदानी क्रीडास्पर्धांमध्ये १७ वर्षांखालील गटात इशिका सावंत हिने ४०० मीटर धावण्याच्या प्रकारात द्वितीय क्रमांक, तर कराटे स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात अरहान जोहेब सोलकर याने प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. वेटलिफ्टिंग स्पर्धेत अवनीश योगेश साळवी याने द्वितीय क्रमांक पटकावला.
दरम्यान, लायन्स क्लब रत्नागिरी शहरतर्फे क्रांतीदिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये शाळेच्या एनसीसी युनिटने देखील चमकदार कामगिरी केली. वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक, संचलन प्रकारात द्वितीय क्रमांक, तसेच घोषवाक्य स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत त्यांनी देशभक्तीचा आणि शिस्तीचा उत्तम परिचय दिला. या सर्व यशस्वी कामगिरीमध्ये शाळेच्या व्यवस्थापिका सिस्टर आफरा परेरा, मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट परेरा, सुपरवायझर सिस्टर ॲनी डान्टस, तसेच शाळेतील क्रीडा शिक्षक, शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट परेरा यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमधील विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडाक्षेत्रातही सतत प्रावीण्य मिळवत आहेत. हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाने सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलने पुन्हा एकदा सिद्ध केले की, समर्पण आणि सातत्य हेच यशाचे खरे गमक आहे.

