(मुंबई / वृत्तसंस्था)
मुंबईतील उपनगर विक्रोळी एका महिलेच्या हत्येच्या घटनेने हादरले आहे. टागोरनगर परिसरातील केळी विक्रेत्या सुनीता मोरे या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होत्या. दरम्यान, स्वयंभू हनुमान मार्केटमधील एका बंद दुकानातून दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी दुकान उघडले असता आत एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मृतदेहाची ओळख पटवली असून, सुनीता मोरे यांच्या हत्येप्रकरणी संशयिताला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्टला या महिलेचा मृतदेह आढळला. सुनीता 29 वर्षांच्या होत्या. त्या 25 ऑगस्टला केळी विकण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या बांगडी विक्रेता फजूल रेहमान मेहरबान कुरेशी याने त्यांना काही कारण सांगून मच्छीमार्केटमधील बंद दुकानात नेले. त्या दुकानात त्याने सुनीता मोरे यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सुनीता यांनी त्याला विरोध करत आरडाओरड केली. मात्र, त्यांना मदतीसाठी कोणीही आले नाही. सुनीता यांनी आरडाओरड केल्याने दुसरे कोणी तेथे येऊन घटनेची वाच्यता करेल, या भीतीने फजूल याने त्यांची हत्या केली आणि मृतदेह बंद दुकानात टाकून दिला.
सुनीता घरी न आल्याने त्यांच्या पतीने त्यांचा शोध सुरू केला. अखेर 26 ऑगस्टला त्यांनी पोलिसांकडे पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. 29 ऑगस्टला पोलिसांना सुनीता यांचा मृतदेह मिळाला. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने ओळख पटवणेही कठीण होते. मात्र, त्यांच्या पतीने बोटावरून मृतदेहाची ओळख पत्नी सुनीता मोरे यांचीच असल्याचे पटवले.
दरम्यान, सुनीता मोरे यांच्या पतीने प्रसारमाध्यमांशी बोलताना या घटनेत केवळ एक आरोपी नसून आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, सुनीता 25 तारखेला घरातून बाहेर पडल्या होत्या. त्या परत न आल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 29 तारखेला पोलिसांचा फोन आला. मृतदेह कोणाचा आहे, हे ओळखणे कठीण होते; मात्र बोटावरून तो आपल्या पत्नीचाच मृतदेह असल्याचे त्यांनी ओळखले.
घटनेनंतर विक्रोळी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयाच्या आधारे फजूल रेहमान मेहरबान कुरेशी याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान त्याने सुनीता मोरे यांच्या हत्येची कबुली दिल्याचे समोर आले असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
‘आरोपी एकटा नाही’, पतीचा दावा
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीने वेगळा दावा केला असल्याचे सुनीता मोरे यांच्या पतीचे म्हणणे आहे. मात्र, या हत्येमागे आरोपीसोबत आणखी काही जण सहभागी असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरू असून, हत्येमागील नेमके कारण तसेच आणखी कोणी या घटनेत सहभागी आहे का, याचा तपास केला जात आहे.
सुनीता मोरे यांच्या पश्चात पती आणि तीन लहान मुले आहेत. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आरोपीवर कठोर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

