(सातारा / वृत्तसंस्था)
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने महिंद्रा थार (Mahindra Thar) गाडी घेऊन पसार झालेल्या एका अट्टल गुन्हेगाराला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोलापुरातून अटक केली आहे. तब्बल 50 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी या गाजलेल्या चोरीचा उलगडा केला. आरोपीकडून सातारा आणि चाकण (पुणे) येथून चोरीला गेलेल्या दोन महिंद्रा थार गाड्या जप्त करण्यात आल्या असून, आरोपीवर यापूर्वी खुनाचा गुन्हाही दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जुलै रोजी सातारा शहरातील महिंद्रा शोरूममध्ये एक व्यक्ती टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने थार गाडी घेऊन गेला. मात्र, गाडी परत न आणता तो फरार झाला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला.
सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा हाती लागत नव्हता. मात्र, शहरातील विविध भागांतील 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. तपासादरम्यान आरोपीला घेण्यासाठी आलेल्या दुसऱ्या एका कारचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला. त्या वाहनाच्या मालकाचा शोध घेतल्यानंतर संशयित आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. त्या कार मालकाचा शोध घेतला आणि त्याच्या माध्यमातून संशयित आरोपीचं नाव शोधण्यात पोलिसांना यश आलं.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सोहेल अफजल बागवान (मूळ रा. जुनी पेठ, पंढरपूर; सध्या रा. बुधवार पेठ, सोलापूर) असे आहे. चौकशीत आरोपीचे वाई येथे नातेवाईक असल्याचे तसेच काही दिवस तो साताऱ्यात भाड्याच्या खोलीत राहत असल्याचेही समोर आले आहे.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली. आरोपीवर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असून तो पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आल्यानंतरच त्याने ही वाहनचोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. तसेच सातारा आणि चाकण येथून चोरीला गेलेल्या दोन महिंद्रा थार गाड्या त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि सायबर पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली असून, आरोपीकडून आणखी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

