(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणातील आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या हापूस आंबा हंगामाला यंदा हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे मोठा फटका बसला असून एप्रिल अखेरीसच हंगाम संपुष्टात आल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो नेपाळी गुरख्यांनी परतीचा मार्ग धरला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबा हंगामाच्या पार्श्वभूमीवर नेपाळी कामगार मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल झाले होते. मात्र यंदा अवकाळी पाऊस, कडाक्याचे ऊन आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे आंब्याचे उत्पादन घटले. यामध्येच मे महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या जोरदार पावसामुळे झाडांवर उरलेला आंबाही गळून पडल्याने बागायतदारांच्या आशा पूर्णपणे मावळल्या.
या परिस्थितीमुळे काम उरले नसल्याने अनेक गुरख्यांनी आपला मेहनताना घेऊन नेपाळच्या दिशेने कूच केली आहे. काही दिवसांपूर्वीच शेकडोंच्या संख्येने गुरखे गटागटांनी रेल्वे व इतर वाहनांनी परतीचा प्रवास सुरू केला असून, बागायतदारांनाही त्यांना काम न देता घरी पाठवण्याची वेळ आली आहे. आंबा उत्पादकांसाठी यंदाचा हंगाम आर्थिकदृष्ट्या तोट्याचा ठरला असून याचा सर्वसामान्य परिणाम संपूर्ण कोकणातील अर्थचक्रावर होताना दिसतो आहे.