(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर रेल्वे स्थानक परिसरात उभी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसच्या बॅटरी कक्षात मध्यरात्री अचानक तांत्रिक बिघाड होऊन मोठा स्फोटसदृश आवाज झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कानठळ्या बसवणाऱ्या या आवाजामुळे रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने, घटना घडली त्या वेळी बसमध्ये प्रवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरुख आगाराची देवरुख-संगमेश्वर रेल्वे स्थानक ही एसटी बस (क्रमांक MH 14 LX 7142) दिवा-रत्नागिरी पॅसेंजरने येणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी मध्यरात्री स्थानक परिसरात उभी होती. रात्री सुमारे १.१० वाजण्याच्या सुमारास बसच्या बॅटरी कक्षातून अचानक मोठा स्फोटसदृश आवाज झाला. सुरुवातीला हा आवाज कशामुळे झाला, याचा अंदाज न आल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
घटनेनंतर बसच्या बॅटरी कक्षातून धूर तसेच पाणी आणि ॲसिडमिश्रित द्रव बाहेर येताना दिसला. प्राथमिक माहितीनुसार, बॅटरी प्रणालीतील तांत्रिक बिघाड किंवा शॉर्टसर्किटमुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, काही वेळातच दिवा-रत्नागिरी पॅसेंजर स्थानकात दाखल झाली. देवरुखकडे जाणाऱ्या प्रवाशांनी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला असता, बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती सेवा रद्द करण्यात आल्याची माहिती वाहकाने दिली. त्यानंतर पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली; मात्र ती येईपर्यंत प्रवाशांना जवळपास एक तास मध्यरात्री स्थानकावर प्रतीक्षा करावी लागली. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना विशेषतः गैरसोयीचा सामना करावा लागला.
या घटनेनंतर एसटीच्या वाहनांच्या तांत्रिक तपासणी आणि देखभालीबाबत प्रवाशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नियमित देखभाल आणि सुरक्षा तपासणी अधिक काटेकोरपणे करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधावे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

