(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर जून महिन्यात घडलेल्या दुर्दैवी बुडीत दुर्घटनेनंतर प्रतिकूल हवामान, उधाणलेला समुद्र आणि प्रचंड लाटांचा सामना करत शोध मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard) अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
गणपतीपुळे येथे २० जून २०२६ रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बीडकीन येथून पर्यटनासाठी आलेल्या १९ जणांच्या समूहातील आठ पर्यटक समुद्रात उतरले होते. मात्र, समुद्रातील पाण्याची खोली आणि लाटांच्या तीव्रतेचा अंदाज न आल्याने ते प्रवाहात वाहून गेले. स्थानिक जीवरक्षक आणि ग्रामस्थांनी तत्परता दाखवत तिघांना सुरक्षित बाहेर काढले, तर पाच तरुण बेपत्ता झाले. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने समुद्रात मोटारबोटींच्या सहाय्याने तातडीने शोध मोहीम सुरू केली. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस, भारतीय तटरक्षक दल आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने समन्वयाने व्यापक शोधकार्य हाती घेतले.
भारतीय तटरक्षक दलाने अत्याधुनिक जलवाहने, प्रशिक्षित अधिकारी आणि अनुभवी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने प्रतिकूल हवामानातही अखंडपणे शोधकार्य सुरू ठेवले. उधाणलेला समुद्र, प्रचंड लाटा आणि सतत बदलणाऱ्या हवामानाच्या आव्हानांवर मात करत त्यांनी रत्नागिरी पोलीस दलासोबत प्रभावी समन्वय साधला. या अथक प्रयत्नांमुळे अखेर सर्व बेपत्ता पर्यटकांचे मृतदेह शोधण्यात यश आले. या कठीण मोहिमेदरम्यान भारतीय तटरक्षक दलाने दिलेल्या मोलाच्या सहकार्याची दखल घेत रत्नागिरी पोलीस दलाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या धाडसी, शिस्तबद्ध आणि समर्पित कार्याचे विशेष कौतुक केले. नैसर्गिक संकटाच्या प्रसंगी विविध यंत्रणांमधील प्रभावी समन्वय आणि सेवाभावामुळेच अशा शोध मोहिमा यशस्वी ठरतात, असे नमूद करत त्यांनी भारतीय तटरक्षक दलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. समुद्रातील आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दल, भारतीय तटरक्षक दल, स्थानिक जीवरक्षक आणि प्रशासन यांनी दाखविलेला समन्वय हा आपत्ती व्यवस्थापनाचा आदर्श नमुना ठरला असून, संकटसमयी कर्तव्यनिष्ठेने उभे राहणाऱ्या प्रत्येक हाताचा सन्मान करण्याची परंपरा रत्नागिरी पोलीस दलाने या गौरव सोहळ्याच्या माध्यमातून जपल्याची भावना व्यक्त होत आहे.

