(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांचा सुळसुळाट वाढत असताना त्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाचा कारभार केवळ कागदोपत्रीच सुरू आहे का, असा सवाल उपस्थित करणारी घटना टीआरपी परिसरात घडली. राजापूरहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसने सावंत पॅलेस हॉटेलसमोर रस्त्यावर आलेल्या गायीला जोरदार धडक दिली. या धडकेत गायीचा जागीच मृत्यू झाला. आज सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
राजापूर-रत्नागिरी एसटी बस टीआरपी परिसरात आली असता अचानक रस्त्यावर आलेल्या गायीला बसची धडक बसली. धडकेनंतर गायीचा जागीच मृत्यू झाला. बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रत्नागिरीकडे रवाना करण्यात आले, तर चालक बससह घटनास्थळीच थांबून राहिला. या घटनेचे गांभीर्य केवळ एका गायीच्या मृत्यूपुरते मर्यादित नाही. अवघ्या चार दिवसांपूर्वी याच परिसरात वाहनाच्या धडकेत एका बैलाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर पुन्हा त्याच परिसरात एसटी बसच्या धडकेत गायीचा मृत्यू झाला आहे. एकाच ठिकाणी काही दिवसांच्या अंतराने घडलेल्या या दोन घटना रस्त्यावर मोकाट गुरांचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, याची जणू प्रशासनाला मिळालेली धोक्याची घंटाच आहे. मात्र, या घटनांनंतरही प्रशासन नेमके कोणत्या दुर्घटनेची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर गुरे मोकाट फिरताना दिसतात. दिवसा वाहतुकीमध्ये अचानक गुरे आल्याने वाहनचालकांची तारांबळ उडते, तर रात्रीच्या वेळी काळोखात रस्त्यावर बसलेली किंवा उभी असलेली गुरे वाहनचालकांना सहज दिसत नाहीत. परिणामी गंभीर अपघाताची शक्यता वाढते. आज गायीचा बळी गेला; उद्या एखाद्या दुचाकीस्वाराचा किंवा चारचाकीतील प्रवाशाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
गुरे रस्त्यावर सोडणाऱ्या मालकांवर कारवाई करण्याची तरतूद असतानाही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कितपत होते, हा प्रश्न कायम आहे. गुरांना पकडण्यासाठी नियमित मोहीम, सुरक्षित निवारा, मालकांचा शोध आणि दंडात्मक कारवाई याबाबत ठोस यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. प्रत्येक अपघातानंतर पंचनामा करून विषय संपविण्यापेक्षा नाहक गुन्ह्यांचे बळी वाहनचालक ठरत आहेत. असे अपघात घडूच नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे. मात्र रस्त्यावर गुरे आली की वाहनचालकाने ब्रेक दाबायचा आणि प्रशासनाने मात्र डोळ्यांवर झापडं ठेवायची, अशी परिस्थिती कायम राहणार असेल तर पुढील दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार?
वारंवार होणाऱ्या या घटनांची गंभीर दखल घेऊन संबंधित स्थानिक प्रशासनाने मोकाट गुरांचा तातडीने बंदोबस्त करावा, गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी आणि अपघातप्रवण ठिकाणी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गायीचा मृत्यू ही केवळ एक दुर्घटना नाही; रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांच्या प्रश्नाकडे वर्षानुवर्षे होत असलेल्या दुर्लक्षाचा हा आणखी एक धोकादायक परिणाम आहे. आता तरी प्रशासनाने जागे व्हावे, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.


