(सांगली / वृत्तसंस्था)
वाळवा तालुक्यातील एका निवासी स्पर्धा परीक्षा अकॅडमीत शिक्षण घेणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अकॅडमीचे संस्थापक काशीनाथ रामचंद्र नांगरे आणि त्याची पत्नी मनीषा काशीनाथ नांगरे (दोघे रा. गोटखिंडी, ता. वाळवा) यांच्याविरोधात आष्टा पोलीस ठाण्यात पोक्सोसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशीनाथ नांगरे याला अटक करण्यात आली असून त्याची पत्नी मनीषा नांगरे सध्या फरार आहे.
या अकॅडमीत स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. येथे निवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी राहतात. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तीन अल्पवयीन विद्यार्थिनी या अकॅडमीत निवासी शिक्षण घेत होत्या. ११ जून २०२६ पासून त्यांच्याबाबत हा प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप आहे. रात्री मुली झोपेत असताना अकॅडमीचा संस्थापक काशीनाथ नांगरे त्यांच्याजवळ जाऊन लैंगिक गैरप्रकार करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
पीडित विद्यार्थिनींनी घडलेल्या प्रकाराची माहिती अकॅडमीतील मॅडम तसेच संशयित आरोपीची पत्नी मनीषा नांगरे हिला दिली होती. मात्र, मुलींना मदत करण्याऐवजी मनीषा नांगरे हिने हा प्रकार कोणाला सांगू नका, अन्यथा तुमचे शैक्षणिक नुकसान करेन, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी काही काळ हा प्रकार सांगितला नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, ‘शिक्षक दिना’दिवशी गुरुदक्षिणेच्या नावाखाली मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संचालक काशीनाथ नांगरे यांच्याकडून तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा ११ जून २०२६ पासून वारंवार मानसिक छळ तसेच अत्याचार आणि विनयभंग झाल्याची तक्रार आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी मनीषा नांगरे हिने दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या घटनेची तक्रार समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पालकांमध्ये घबराट पसरली. अनेक पालकांनी तातडीने अकॅडमीत जाऊन आपल्या मुलांना ताब्यात घेतले. त्यानंतर विद्यार्थिनींकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतल्यानंतर काही संतप्त नागरिकांनी नांगरे याला चोप दिला. यानंतर रविवारी सायंकाळी उशिरा पालकांनी आष्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५(२), ३५१(२) तसेच (पोक्सो) कायदा कलम अन्वये काशीनाथ नांगरे व मनीषा नांगरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीच्या आधारे आष्टा पोलिसांनी काशीनाथ नांगरे याला ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणातील त्याची पत्नी मनीषा नांगरे हिचा शोध सुरू आहे.
निवासी शैक्षणिक संस्थेत अल्पवयीन मुलींबाबत घडलेल्या या प्रकारानंतर जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. निवासी शाळा आणि संस्थांमध्ये मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा घटनांबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. निवासी शाळांमधील मुलींच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने कडक कायदे करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.


