( पाली / वार्ताहर )
हातखंबा जिल्हा परिषद गटातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध विभागांच्या योजना प्रभावीपणे पोहोचण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती मिळावी तसेच अपूर्ण प्रस्ताव मार्गी लागावेत यासाठी गावनिहाय विशेष शिबिरे आयोजित करण्यात येतील, अशी घोषणा प्रभाग संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अॅड. सुयोग कांबळे यांनी केली. पाली येथे आयोजित हातखंबा जिल्हा परिषद गटाच्या प्रभाग संघाच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बैठकीत विविध शासकीय विभागांच्या योजना आणि सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ‘मागेल त्याला काजू’, ॲग्रीस्टॅक, ई-केवायसी, फळपीक विमा, शेतकरी कर्ज योजना आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत हातखंबा जि.प. गटातील पाणीपुरवठा योजना, रस्ते, साकव आणि विविध विकासकामांच्या सद्यस्थितीचा संबंधित विभागांकडून आढावा घेण्यात आला. पावसाळ्यात साथीचे रोग उद्भवू नयेत यासाठी आरोग्य विभागाने विशेष सतर्कता बाळगून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
बैठकीस समिती सचिव तथा पंचायत समिती गटविकास अधिकारी प्राजक्ता शिरधनकर, खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रतिनिधी, पाली ग्रामीण रुग्णालय, पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, केंद्रप्रमुख, महसूल मंडळ अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
याशिवाय हातखंबा, नाणीज, निवळी, पाली, कशेळी, खानू, साठरे, वळके, कापडगाव, चरवेली आणि वेळवंड येथील सरपंच, उपसरपंच, प्रशासक आणि अन्य लोकप्रतिनिधींनी बैठकीस उपस्थित राहून विविध स्थानिक प्रश्न मांडले.

