( देवरूख / वार्ताहर )
संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण येथे फेसबुकवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीच्या बनावट क्रेडिट कार्ड योजनेच्या जाहिरातीला बळी पडून ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ लाख ५३ हजार ४५९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत विलास नारायण कोळपे (वय ७६, ता. संगमेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ८ जुलै २०२६ रोजी रात्री साडेआठ ते ९ वाजण्याच्या सुमारास फेसबुक पाहत असताना त्यांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड योजनेची जाहिरात दिसली. त्यांनी त्या जाहिरातीतील ‘साईनअप’ पर्यायावर क्लिक करताच एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला.
संबंधित व्यक्तीने आपण बँक ऑफ महाराष्ट्रमधून बोलत असल्याचे सांगून हिंदी भाषेत संवाद साधला. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने फिर्यादींकडून डेबिट कार्डचा १६ अंकी क्रमांक घेतला. त्यानंतर व्हॉट्सअॅप कॉलचे व्हिडीओ कॉलमध्ये रूपांतर करून मोबाईलचा कॅमेरा चेहऱ्यासमोर ठेवण्यास सांगितले. या प्रक्रियेदरम्यान मिळालेल्या माहितीचा गैरवापर करून सायबर भामट्याने फिर्यादींच्या पेन्शन खात्यातून १ लाख ५३ हजार ४५९ रुपये ऑनलाइन पद्धतीने लंपास केले.
या प्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० मधील कलम ६६(क) व ६६(ड) अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सायबर फसवणुकीचा अधिक तपास देवरूख पोलीस करत आहेत.

