(संगमेश्वर / एजाज पटेल)
पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेसह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे येथील ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना चिपळूण येथील प्रसिद्ध सांस्कृतिक संस्था ‘चैतन्य आर्टस्’चा यंदाचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
गेली २५ वर्षे संगीत, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या ‘चैतन्य आर्टस्’ संस्थेच्या वतीने शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित ‘आषाढवारी’ या भक्तीसंगीत कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम निर्मळ, उपाध्यक्ष दिलीप संकपाळ आणि सचिव अरविंद जोगळे यांनी पत्राद्वारे ही अधिकृत माहिती दिली.
वयाची साठी ओलांडल्यानंतरही सत्यवान विचारे यांनी पत्रकारितेतील आपली तळमळ कायम ठेवली आहे. ग्रामीण भागातील समस्या, सामान्य नागरिकांवरील अन्याय आणि लोकहिताचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी ते आजही सक्रियपणे कार्यरत आहेत. समाजाभिमुख पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
सत्यवान विचारे यांनी १९९७ मध्ये पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक वृत्तपत्रांत संगमेश्वर तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले आणि अद्यापही कार्यरत आहेत.
पत्रकारितेबरोबरच पत्रकार संघटनात्मक चळवळीतही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘ऑल जर्नलिस्ट अँड मीडिया सर्कल’ या राष्ट्रीय स्तरावरील पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय खजिनदार म्हणून ते गेली ११ वर्षे जबाबदारी सांभाळत आहेत.
सत्यवान विचारे यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याने संगमेश्वर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

