(रत्नागिरी / वार्ताहर)
देवरुख येथील ओमेगा गार्डन हॉलमध्ये १० ते १२ जुलैदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा २०२६ मध्ये रत्नागिरीच्या एसआरके तायक्वांदो क्लबची राष्ट्रीय खेळाडू कु. स्वरा साक्षी विकास साखळकर हिने कॅडेट गटातील ५५ किलोखालील वजनी गटात सुवर्णपदक पटकावत पुन्हा एकदा आपल्या यशाची परंपरा कायम राखली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्वराने यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके जिंकून रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढवला आहे. ती रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक १५ (दामले विद्यालय) येथे शिक्षण घेत आहे.
स्वराच्या या यशामागे एसआरके तायक्वांदो क्लबचे प्रमुख प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच शाहरुख शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
तिच्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे खजिनदार व जिल्हाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी तसेच क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारप्राप्त तायक्वांदो प्रशिक्षक मिलिंद भागवत यांनी तिचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
याशिवाय एसआरके तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांनी स्वराच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

