(मुंबई / वृत्तसंस्था)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता निमिष कुलकर्णी आता ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या सहज अभिनयाने आणि अचूक विनोदी टायमिंगने रसिकांची मने जिंकणाऱ्या निमिषचा हा मराठी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हा चित्रपट 21 ऑगस्ट रोजी राज्यभर प्रदर्शित होणार आहे.
‘मर्डरवाले कुलकर्णी’ या गाजलेल्या मराठी नाटकानंतर निमिषने हिंदी चित्रपट ‘अग्नि’मध्येही लक्षवेधी भूमिका साकारली. त्यानंतर ‘सनई चौघडे’ मालिकेद्वारेही त्याने आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. आता ‘द्विधा’च्या माध्यमातून तो पुन्हा एकदा भावनिक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.
‘द्विधा’मध्ये साकारणार ‘आदित्य’ची संवेदनशील भूमिका
या चित्रपटात निमिष ‘आदित्य’ (आदि) ही व्यक्तिरेखा साकारत आहे. समजूतदार, विश्वासू आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा आदि हा श्रावणीचा आत्येभाऊ आहे. लहानपणापासून एकत्र वाढल्यामुळे त्यांच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि आठवणींची घट्ट वीण आहे. आदि फारसा बोलका नसला तरी इतरांच्या मनातील न बोललेले भाव ओळखण्याची विलक्षण संवेदनशीलता त्याच्यात आहे. आपल्या माणसांसाठी शांतपणे खंबीरपणे उभे राहणे हीच त्याची खरी ताकद असून, त्याच्या व्यक्तिमत्त्वातून नात्यांमधील निःशब्द आधाराची सुंदर जाणीव प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
निमिष कुलकर्णी काय म्हणाला?
या भूमिकेबद्दल बोलताना निमिष कुलकर्णी म्हणाला, “‘द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात दडलेल्या भावनांचा प्रवास आहे. या चित्रपटातील भूमिका साकारताना अनेक भावनिक पैलू अनुभवायला मिळाले. दिग्दर्शक निलेश भास्कर नाईक यांची संवेदनशील मांडणी आणि अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत समृद्ध करणारा ठरला. प्रेक्षकांनी आजवर माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. ‘द्विधा’मधील माझी ही भूमिका देखील त्यांना नक्कीच आवडेल, अशी मला आशा आहे.”
बाप-लेकीच्या नात्याची भावनिक कहाणी
‘द्विधा’ हा चित्रपट बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत, प्रेम, विश्वास आणि नात्यांतील संवेदनशील क्षण उलगडणारा आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांनी केले असून विदुला रमेश आजगावकर यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटात सतीश पुळेकर, रेणुका दफ्तरदार, मानसी कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि ओवी तानवडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘द्विधा’ हा भावनिक आशय, मजबूत कलाकारांची फळी आणि संवेदनशील कथानक यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावणारा मराठी चित्रपट ठरत असून, तो 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

