(रत्नागिरी)
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात बदली पोर्टलवर नवीन भरती झालेल्या शिक्षकांची माहिती भरून घेतली जात आहे. पुढील टप्प्यात इच्छुक शिक्षकांची माहिती भरून घेतली जाणार आहे. या बदलठ्यांमुळे ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या संख्येत पुन्हा वाढ होणार आहे.
मागील दोन वर्षांत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीने सुमारे साडेतीनशेहून अधिक शिक्षक परजिल्ह्यात गेले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या दोन हजारांवर पोहोचली. सुदैवाने, गतवर्षी निवडणुकीच्या तोंडावर भरती झाल्यामुळे ११०० शिक्षक नव्याने मिळाले. मात्र, अपुऱ्या शिक्षकांमुळे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीनंतर राज्यशासनाने नव्याने भरती झालेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेवर अंकुश लावला आहे.
रिक्त पदांची संख्या वाढत असतानाच मार्च महिन्यात नव्याने आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात रिक्त पदांचा टक्का वाढू शकतो. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष एप्रिलअखेरीस पूर्ण होणार आहे. त्यानंतर जून महिन्यात पुढील शैक्षणिक सत्र सुरू होईल. या टप्प्यात आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली तर ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची पुन्हा वानवा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.