(रत्नागिरी / वार्ताहर)
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने राबविण्यात आलेल्या ‘प्रत्येक भक्त एक वृक्ष’ या पर्यावरण जनजागृती अभियानाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि. ५ ते १९ जुलै २०२६ या अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत ६ लाख १८ हजार ९ वृक्षांची (६,१८,००९) विक्रमी लागवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या अभियानात देशभरातील हजारो भक्तांनी उत्साहाने सहभाग घेत गाव, शहरे, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे, नदीकाठ तसेच विविध मोकळ्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मोठी चालना मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.
जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी आपल्या प्रवचनांमधून प्रत्येकाने आयुष्यात किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संदेश सातत्याने देत असतात. केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही ते आवर्जून अधोरेखित करतात.
गेल्या अनेक वर्षांपासून वसुंधरा पदयात्रा, वृक्षसंवर्धन जनजागृती अभियान तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ‘झाडे लावा, झाडे जगवा आणि वृक्षतोड थांबवा’ हा संदेश ते समाजापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांच्या प्रेरणेतून देशभरात पर्यावरण संवर्धनाची व्यापक जनचळवळ उभी राहिली असून, यंदाच्या अभियानात झालेली ६,१८,००९ वृक्षांची लागवड ही या जनआंदोलनाची ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कामगिरी मानली जात आहे.

