(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाने सोमवारी आक्रमक वळण घेतले. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला 31 दिवस पूर्ण झाल्यानंतर संसद भवनावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मात्र, दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करत आंदोलकांना रोखल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने नवी दिल्ली परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. जंतरमंतर परिसरात बॅरिकेड्स उभारून आंदोलकांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले. तरीही काही आंदोलक पोलिसांचा बंदोबस्त चुकवत संसद भवन परिसरापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. त्यानंतर संसद मार्ग आणि विजय चौक परिसरातील प्रवेशद्वारे तातडीने बंद करण्यात आली.
संसद भवन परिसरात सध्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून सर्व प्रवेशमार्गांवर पोलीस, निमलष्करी दल आणि CISF चे जवान तैनात आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वॉटर कॅननसह अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे.
बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न; लाठीचार्ज आणि अश्रुधूराचा वापर
संसद भवनापासून काही अंतरावर आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी लाठीचार्ज केला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. या धावपळीत काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांवर दगडफेक झाल्याचाही दावा करण्यात आला असून एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
अभिजीत दिपके ताब्यात असल्याचा दावा
आंदोलनादरम्यान सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सोशल मीडियावर केला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या दाव्याबाबत दिल्ली पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
जे. पी. नड्डा यांची भेट
सौरभ दास यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितले की, त्यांनी आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी पुढील चर्चेचे आश्वासन मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीसाठी रवाना
दरम्यान, आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. NEET पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
NEET पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पुढील घडामोडींवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

