(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील श्री देव रवळनाथ मंदिराच्या देवराई परिसरात सह्याद्री संकल्प सोसायटी, देवरुख, ग्रामपंचायत देवळे आणि ग्रामसमृद्धी अभियान, देवळे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध दुर्मिळ प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाला सह्याद्री संकल्प सोसायटीचे सदस्य विराज आठल्ये आणि महेंद्र चव्हाण प्रमुख उपस्थित होते. ग्रामसमृद्धी अभियानाचे अध्यक्ष निलेश कोळवणकर, रवळनाथ ट्रस्टचे अध्यक्ष गजानन काळोखे, यशवंत घागरे गुरुजी, भाऊ कानडे, संतोष परशेटे, दिनेश परशेटे, अनंत खातू, बाबा गुरव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश कोळवणकर यांनी केले. यावेळी विराज आठल्ये आणि महेंद्र चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सह्याद्री संकल्प सोसायटीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या हॉर्नबिल (धनेश) पक्षी संवर्धन उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांनी अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचा संकल्प केला.
या उपक्रमांतर्गत सह्याद्री संकल्प सोसायटीने उपलब्ध करून दिलेल्या दुर्मिळ प्रजातींच्या वृक्षांची रवळनाथ देवराई तसेच देवळे येथील काड्याजवळील स्मशानभूमी परिसरात लागवड करण्यात आली. भविष्यात या परिसरात दुर्मिळ वृक्षांची समृद्ध बाग विकसित करण्याचाही निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी सह्याद्री संकल्प सोसायटीने पर्यावरण संवर्धनासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल देवळे ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही असेच सहकार्य लाभावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

