(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड-गणपतीपुळे परिसरात भटक्या गोवंशाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या संगोपनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पर्यटन व्यवसायाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेकांनी शेती आणि पशुपालनाकडे पाठ फिरवल्याने गोवंश बेवारस होत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यासाठी किमान एक हजार गोवंशांची क्षमता असलेली शासकीय गोशाळा उभारावी, अशी मागणी नागरिक, शेतकरी आणि प्राणीप्रेमींमधून होत आहे.
मालगुंड-गणपतीपुळे परिसरात पर्यटनामुळे आर्थिक संधी वाढल्या असल्या, तरी त्याचा परिणाम पारंपरिक शेती आणि पशुपालन व्यवसायावर झाला आहे. शेती तोट्याची ठरत असल्याने अनेक शेतकरी पर्यटनाशी संबंधित व्यवसायांकडे वळत आहेत. परिणामी जनावरांचे संगोपन कमी होत असून अनेक गुरे बेवारस अवस्थेत रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
रत्नागिरी तालुक्यात सध्या एक हजारहून अधिक भटकी गुरे, विशेषतः गोवंश, रस्त्यावर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या जनावरांना ना पुरेसा चारा मिळतो, ना सुरक्षित निवारा. अन्नाच्या शोधात ही गुरे कचऱ्यातील प्लास्टिकच्या पिशव्या खात असल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. तसेच गाभण गायींमध्ये प्रसूतीसंबंधी गुंतागुंत निर्माण होऊन त्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत.
स्थानिकांच्या माहितीनुसार, मालगुंड-गणपतीपुळे परिसरात अशा कारणांमुळे दर आठवड्याला दोन ते तीन गायींचा मृत्यू होत आहे. काही दिवसांपूर्वी प्रसूतीत अडकलेल्या एका भटक्या गायीसह तिच्या वासराचे प्राण स्थानिक प्राणीमित्र आणि शेतकऱ्यांनी अथक प्रयत्नांतून वाचवले होते. या घटना भटक्या गोवंशाच्या दयनीय स्थितीकडे लक्ष वेधणाऱ्या आहेत.
पशुसंवर्धन विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन भटक्या गोवंशासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. बदलत्या काळात पशुपालन व्यवसायाकडे तरुण पिढीचा कल कमी होत असल्याने भविष्यात भटक्या जनावरांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात किमान एक हजार गोवंशांची क्षमता असलेली सुसज्ज शासकीय गोशाळा उभारून या भटक्या जनावरांच्या संगोपनाची व्यवस्था करावी, अशी मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.

