(चिपळूण / वार्ताहर)
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी-चिंचघरी (सती) येथे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पुणे यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आपत्तीच्या काळातील दक्षता, प्रथमोपचार आणि बचावकार्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वरेकर होते. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन NDRF पथकाचे स्वागत केले तसेच कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी NDRF पुणेचे इन्स्पेक्टर सुरेंद्र कुमार, हवालदार सुनील इदाते, संदीप बांगर, संजय यादव, संदीप चिंचवाले तसेच शिपाई निर्भय कुमार आणि परपाकला गुडी उपस्थित होते.
इन्स्पेक्टर सुरेंद्र कुमार यांनी NDRF च्या कार्याची माहिती देताना देशभरात घडलेल्या विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा आढावा घेतला. आपत्तीच्या प्रसंगी घाबरून न जाता योग्य पद्धतीने कशी प्रतिक्रिया द्यावी, स्वतःचा व इतरांचा जीव कसा वाचवावा याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच अशा कार्यशाळांमधील प्रात्यक्षिके आयुष्यभर उपयोगी पडणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत रक्तस्त्राव थांबविण्याच्या प्राथमिक उपचारांची पद्धत, हृदयविकाराच्या झटक्याच्या रुग्णाला CPR देण्याची योग्य पद्धत, अपघात किंवा पूरस्थितीत उपलब्ध साधनांचा वापर करून तात्पुरते स्ट्रेचर तयार करण्याचे तंत्र तसेच बचावकार्याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. याशिवाय शाळा सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीतील आवश्यक उपाययोजनांबाबत शिक्षकांनाही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास उपमुख्याध्यापिका सौ. जगताप, पर्यवेक्षिका सौ. सावंत, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हातणकर यांनी केले, तर शिवाजी पाटील यांनी आभार मानले.

