(परभणी / वृत्तसंस्था)
मराठवाड्याच्या आध्यात्मिक क्षेत्राला मोठा धक्का देणारी दुर्दैवी घटना घडली आहे. दत्त संप्रदायातील ज्येष्ठ संत आणि गेली तब्बल 40 वर्षे अखंड मौनव्रत पाळणारे श्रीक्षेत्र गुंजचे कालिदास महाराज यांचे शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपासवर झालेल्या भीषण रस्ते अपघातात निधन झाले. या अपघातात त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचाही जागीच मृत्यू झाला, तर वाहनचालक गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कालिदास महाराज यांच्या निधनाची बातमी समोर येताच परभणीसह संपूर्ण मराठवाडा, दत्त संप्रदाय आणि हजारो भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
गरुडेश्वर दर्शनावरून परतताना काळाचा घाला
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गुंज येथे वास्तव्यास असलेले कालिदास महाराज हे वासुदेवानंद सरस्वती महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुजरातमधील श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह वाहनाने श्रीक्षेत्र गुंजकडे परत येत असताना छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कालिदास महाराज आणि त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वाहनचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सावत्र आईच्या त्रासातून सुरू झाला अध्यात्माचा प्रवास
कालिदास महाराज यांचे मूळ गाव परभणी जिल्ह्यातील बोरी होते. बालपण अत्यंत संघर्षमय होते. सावत्र आईकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे त्यांनी लहान वयातच घर सोडले. त्यानंतर ते श्रीक्षेत्र गुंज येथे चिंतामणी महाराज यांच्या आश्रयाला आले. आपल्या जीवनातील सर्व वेदना त्यांनी गुरु चिंतामणी महाराजांसमोर व्यक्त केल्या. त्यावेळी गुरुंनी त्यांना एकच सल्ला दिला, “आता तू कोणाशीही बोलू नकोस, फक्त माझ्याशी बोल.” गुरुंच्या या आदेशाला आयुष्याचे व्रत मानत कालिदास महाराजांनी अखंड मौनव्रत स्वीकारले आणि ते आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत काटेकोरपणे पाळले.
40 वर्षे एकही शब्द उच्चारला नाही
गेल्या चार दशकांहून अधिक काळ कालिदास महाराजांनी एकही शब्द उच्चारला नाही. मौनव्रत असूनही त्यांनी हजारो भाविकांना अध्यात्म, सदाचार आणि जीवनमूल्यांचा मार्ग दाखवला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक त्यांच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र गुंज येथे येत असत. महाराज प्रत्येक भाविकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत, पण स्वतः बोलत नसत. भक्तांच्या प्रश्नांना किंवा मार्गदर्शनासाठी ते डायरीमध्ये मोजक्या पण प्रभावी शब्दांत उत्तर लिहून देत असत. संवादाची ही आगळीवेगळी पद्धत त्यांच्या आयुष्यभराची ओळख बनली होती. महाराजांचा केवळ मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात व इतर राज्यात देखील खूप मोठा शिष्य परिवार आहे. प. पू. कालिदास महाराज हे ब्रह्मचारी होते.
डायरीतून दिला व्यसनमुक्ती आणि सदाचाराचा संदेश
कालिदास महाराजांनी आपल्या मौनातूनच समाजप्रबोधन केले. त्यांनी व्यसनमुक्ती, सदाचार, निस्वार्थ सेवा, लोककल्याण आणि अध्यात्मिक जीवनाचा संदेश हजारो लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या डोळ्यांतील करुणा, शांत स्वभाव आणि साधी जीवनशैलीमुळे असंख्य लोक त्यांच्याकडे मानसिक आधार आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी येत असत. त्यांनी कधीही प्रसिद्धीचा मोह बाळगला नाही. साधेपणा, संयम आणि सेवाभाव यामुळे त्यांनी भाविकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते.
दत्त संप्रदायासाठी मोठी हानी
दत्त संप्रदायातील एक आदरणीय संत म्हणून कालिदास महाराजांची ओळख होती. त्यांनी आपल्या आचरणातून अध्यात्म जगले आणि हजारो भक्तांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या निधनामुळे दत्त संप्रदायाचे मोठे नुकसान झाल्याची भावना भाविक व्यक्त करत आहेत.
कालिदास महाराज यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर श्रीक्षेत्र गुंजसह परभणी जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रभरातील त्यांच्या अनुयायांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली असून, अनेक धार्मिक संस्थांनीही दुःख व्यक्त केले आहे. चार दशकांहून अधिक काळ मौनातून समाजाला दिशा देणाऱ्या संताचा प्रवास एका दुर्दैवी अपघाताने संपला असला, तरी त्यांनी दिलेला अध्यात्म, सेवा, व्यसनमुक्ती आणि सदाचाराचा संदेश भाविकांच्या मनात कायम जिवंत राहील.

