(सातारा)
कराडमधील कृष्णा नदीच्या पुलावरून उडी मारलेल्या कल्पना बाळाप्पा वाघमारे (वय 26, रा. वाखाण रोड, कराड; मूळ रा. जत, जि. सांगली) हिचा मृतदेह तब्बल सात दिवसांनी गोंदी (ता. कराड) गावच्या हद्दीत नदीपात्रात आढळून आला. मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने कराड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
मोबाईलवर संभाषणानंतर घेतला टोकाचा निर्णय
२८ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कल्पना दुचाकीवरून पुलावर आली होती. कोणाशी तरी मोबाईलवर बोलल्यानंतर तिनं थेट पुलावरून नदीत उडी घेतली. घटनास्थळी सापडलेल्या सॅकमधील साहित्यावरून नदीत उडी घेणारी कल्पनाच असल्याचे स्पष्ट झाले होते. कल्पना एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत होती. तिच्या बॅगमध्ये पर्स, ओळखपत्र आणि इतर साहित्य होतं. एनडीआरएफचे जवान आणि मच्छीमारांनी सहा दिवस शोधमोहीम राबवूनही मृतदेह सापडला नव्हता.
गोंदी गावच्या हद्दीतील कृष्णा नदीपात्रात एक मृतदेह आढळल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. मृतदेह ओळखणे कठीण होते; मात्र दोन्ही हातावरील टॅटूंवरून कुटुंबीयांनी तो कल्पनाचाच असल्याचे निश्चित केले. डीवायएसपी राजश्री पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
साखरपुड्यानंतर दोन दिवसांतच दुःखद घटना
कल्पनाचा साखरपुडा घटनेच्या दोन दिवस आधीच झाला होता. घरात आनंदाचे वातावरण असताना अचानक तिनं जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कराड शहर पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे, अशी माहिती उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील यांनी दिली.