(चिपळूण /प्रतिनिधी)
स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेवरून नागरिकांमध्ये वाढत असलेल्या संभ्रम आणि नाराजीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी महावितरण कार्यालयात धडक देत प्रशासनाकडे जाब विचारला. या चर्चेनंतर चिपळूण शहर आणि तालुक्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला तूर्तास स्थगिती देण्यात आल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अलीकडेच ‘२४ तासांच्या आत स्मार्ट मीटर बदलून घ्यावेत’ अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धती, वाढीव वीजबिलांचा संभाव्य प्रश्न आणि ग्राहकांच्या हितासंबंधी विविध शंका उपस्थित केल्या जात असल्याने या विषयाने राजकीय रंगही धारण केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री. भांबरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. नागरिकांच्या भावना आणि आक्षेप अधिकाऱ्यांसमोर मांडत स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली.
चर्चेदरम्यान श्री. भांबरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर चिपळूण शहर आणि तालुक्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे शिष्टमंडळाला कळविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी नागरिकांच्या शंका आणि आक्षेप वरिष्ठ पातळीवर पोहोचविण्यात आल्याचे सांगितले. तसेच ग्राहकांच्या हिताला बाधा पोहोचेल किंवा लोकांवर अन्याय करणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम, तालुकाध्यक्ष नितीन उर्फ अबू ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, माजी सभापती सुरेश खापले, माजी उपसभापती पांडुशेठ माळी, अभिजित खताते, माजी युवक अध्यक्ष सिद्धेश लाड, अजमल दलवाई, राकेश चाळके, रवींद्र इंगावले, कृष्णा आंबेडे, रमेश बंगाल, विलास महाडिक, निलेश कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महावितरणची पुढील भूमिका काय असेल आणि स्थगितीचा कालावधी किती असेल, याकडे आता चिपळूणकरांचे लक्ष लागले आहे.

