( रत्नागिरी / वार्ताहर )
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्यावसायिक विकासासाठी जीवन कौशल्ये (Life Skills for Professional Development)’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम १५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत मत्स्य महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संदीप करे (फिजिओथेरपिस्ट, हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन पदव्युत्तर, एमबीए-फायनान्स, पीजीडी-एमएलई तसेच रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनचे अध्यक्ष) उपस्थित होते. यावेळी मत्स्य महाविद्यालयाचे विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. दबीर पठाण, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी तसेच वरिष्ठ रोटेरियन दादा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ. संदीप करे यांनी संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, वेळेचे प्रभावी व्यवस्थापन, संघभावना, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, निर्णयक्षमता आणि भावनिक संतुलन या जीवन कौशल्यांचे व्यावसायिक यशामध्ये असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना सविस्तरपणे पटवून दिले.
ते म्हणाले की, केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून बदलत्या स्पर्धात्मक युगात व्यक्तिमत्त्व विकास, प्रभावी संवादकौशल्य आणि सातत्यपूर्ण कौशल्यवृद्धी यांना तितकेच महत्त्व आहे. जीवन कौशल्ये ही वैयक्तिक प्रगतीबरोबरच व्यावसायिक यशाची गुरुकिल्ली असून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतांचा विकास करून समाजासाठी जबाबदार आणि सक्षम नागरिक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या व्याख्यानाला मत्स्य महाविद्यालय आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे ८५ विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि रोजगारक्षम कौशल्यांच्या वृद्धीसाठी अशा उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संदेश पाटील, डॉ. सुशील कांबळे आणि डॉ. राकेश जाधव यांनी केले.

