( मुंबई )
व्हिएतनाममधील फू क्वोक (Phu Quoc) बेटाजवळ झालेल्या भीषण स्पीडबोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 भारतीय पर्यटकांचे पार्थिव सोमवारी रात्री मुंबईत आणण्यात आले. हनोई येथील भारतीय दूतावासाने याबाबत माहिती दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, हो ची मिन्ह सिटीहून निघालेले व्हिएतनाम एअरलाईन्सचे ‘VN 979’ हे विमान सोमवारी रात्री 9.19 वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. याच विमानातून मृत पर्यटकांचे पार्थिव भारतात आणण्यात आले.
मृतांमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमधील पर्यटक
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 15 भारतीयांपैकी 10 जण तामिळनाडूतील, 3 जण आंध्र प्रदेशातील आणि 2 जण केरळमधील होते. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. पार्थिवे पुढील अंत्यसंस्कारासाठी कोयंबतूर, चेन्नई, हैदराबाद आणि तिरुवनंतपुरम येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कसा झाला अपघात?
शुक्रवारी फू क्वोक बेटाजवळील ‘हॉन मे रुट न्गोई’ (Hon May Rut Ngoai) परिसरात 32 भारतीय पर्यटक आणि 4 स्थानिक कर्मचारी असलेली स्पीडबोट एका बेटावरून परतत असताना किनाऱ्यापासून सुमारे 400 मीटर अंतरावर उलटली. या भीषण दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 16 जणांची सुटका करण्यात आली. उपचारानंतर बहुतांश बचावलेल्या पर्यटकांना भारतात परत आणण्यात आले आहे.
एका भारतीयाची प्रकृती अद्याप गंभीर
दुर्घटनेतून बचावलेल्या एका 49 वर्षीय भारतीय पर्यटकाची प्रकृती अद्याप गंभीर आहे. हनोई येथील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णावर रविवारी संध्याकाळी यशस्वी वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आली असून त्याला पुढील उपचारांसाठी हो ची मिन्ह सिटीतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याचे कुटुंबीयही तेथे पोहोचले आहेत. वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, बुडाल्यामुळे त्याच्या फुफ्फुसांना गंभीर इजा, अनेक दुखापती आणि मेंदूत रक्तस्राव झाला आहे.
चालक ताब्यात, चौकशी सुरू
फू क्वोक हे व्हिएतनाममधील सर्वात मोठे आणि लोकप्रिय पर्यटन बेट मानले जाते. बेटांवरील पर्यटन सहलींसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. स्पीडबोट अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, व्हिएतनाम सरकारने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, स्पीडबोट चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.

