(देवळे / प्रकाश चाळके)
देवरुख आगारातून २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुटणाऱ्या चाफवली मार्गावरील दोन्ही वस्तीच्या एसटी गाड्या अचानक बंद राहिल्याने आज २३ ऑक्टोबर रोजी सकाळी सहामाही परीक्षेसाठी जाणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. कोणतीही पूर्वसूचना न देता गाड्या न सोडल्यामुळे विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने परीक्षा केंद्र गाठण्यासाठी धावपळ करावी लागली. देवरुख आगाराच्या या कारभारामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला.
आज (शुक्रवारी, २३ ऑक्टोबर) रोजी सकाळी ६.३० वाजता चाफवली येथून सुटणारी चाफवली–देवळे–मेघी–परशुरामवाडी–देवरुख ही गाडी देवरुख महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. तसेच चाफवली–देवळे–दाभोळा मार्गे साखरपा–देवरुख या गाडीने साखरपा आणि पाली येथे जाणारे महाविद्यालयीन विद्यार्थी प्रवास करतात. मात्र, सकाळी या दोन्ही गाड्या न आल्याचे समजताच विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली.
सध्या सहामाही परीक्षा सुरू असल्याने वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक होते. गाड्या उपलब्ध नसल्यामुळे वेळेत पोहोचता येणार नाही, अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावू लागली. अखेर मिळेल त्या वाहनाने देवरुख, साखरपा आणि पाली गाठण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागले.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर देवळे येथील दीपक सकपाळ आणि शिवसेनेच्या महिला उपतालुकाप्रमुख रेश्मा परशेटे यांनी देवरुख आगारप्रमुखांकडे दूरध्वनीवरून विचारणा केली. त्यानंतर त्यांनी आगारप्रमुखांशी संपर्क साधला. आगारप्रमुखांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत, आता गाडी पाठवू का, अशी विचारणा केली. मात्र, तोपर्यंत विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने आपापल्या विद्यालयांकडे रवाना झाले होते.
परीक्षेच्या काळात कोणतीही पूर्वसूचना न देता दोन गाड्या बंद राहिल्याने आगाराच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचू शकले नाहीत, तर त्यांच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
या घटनेची देवरुख आगारप्रमुखांनी तातडीने दखल घेऊन दोन्ही गाड्या अचानक का बंद राहिल्या, याची चौकशी करावी. तसेच भविष्यात परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची अशी गैरसोय होऊ नये, यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे.


