(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मिरजोळे एमआयडीसीमधील फ्रिलान्स फिशमील अँड ऑइल या कंपनीतील प्रक्रिया केलेले सांडपाणी मिरकरवाडा किंवा भगवती बंदरात वाहून नेण्यासाठी एमआयडीसी ते बंदर अशी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, या प्रस्तावित पाइपलाइनच्या मार्गावरून स्थानिक नागरिक आणि मच्छीमारांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. पाइपलाइन शहरातून तसेच पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीजवळून जाणार असल्याने संभाव्य आरोग्यविषयक धोके आणि समुद्री प्रदूषणात वाढ होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
प्रस्तावित पाइपलाइनसाठी खोदकाम सुरू झाल्यानंतर या कामाला विरोध वाढू लागला आहे. पाइपलाइन फुटल्यास किंवा त्यातून गळती झाल्यास परिसरातील विहिरींचे पाणी दूषित होण्याची शक्यता असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीजवळून सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन टाकताना सुरक्षिततेच्या उपाययोजना कोणत्या केल्या आहेत, तसेच संभाव्य गळती रोखण्यासाठी कोणती व्यवस्था आहे, याबाबत स्पष्टता देण्याची मागणी होत आहे.
रत्नागिरीच्या किनारपट्टीवर आधीच प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. अशा परिस्थितीत औद्योगिक प्रक्रियेतून निर्माण होणारे सांडपाणी बंदर परिसरात नेल्यास समुद्राच्या प्रदूषणात भर पडू शकते, तसेच दुर्गंधीचा त्रास वाढू शकतो, अशी भीती नागरिक आणि मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. या संभाव्य परिणामांचा अभ्यास करूनच पाइपलाइनच्या कामाबाबत निर्णय घ्यावा, अशी त्यांची भूमिका आहे. या मार्गावर यापूर्वीच अन्य दोन कंपन्यांच्या पाइपलाइन टाकण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यात आणखी एका पाइपलाइनची भर पडल्यास रस्त्यावरील खोदकाम, वाहतुकीतील अडथळे आणि भविष्यात देखभालीच्या कामांमुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे. पाइपलाइनचे काम नियम आणि आवश्यक परवानग्यांनुसार सुरू आहे की नाही, याची प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणीही पुढे आली आहे. संबंधित काम बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून काम थांबवावे, अशी त्यांची मागणी आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
पाइपलाइनमुळे पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता, पर्यावरण आणि मच्छीमारांच्या उपजीविकेवर संभाव्य परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना या कामाबाबत संबंधित कंपनी आणि प्रशासनाची भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांच्या शंकांचे निरसन न करता काम पुढे सुरू ठेवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.


