(पनवेल)
अलिबागनंतर शेकापक्षाला पनवेलमध्येही मोठे खिंडार पडले आहे. पक्षाचे प्रमुख नेते जे. एम. म्हात्रे आणि त्यांचे पूत्र प्रितम म्हात्रे यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यांच्यासोबत शेकापचे अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक बुधवारी (७ मे) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शेकापने महाआघाडीची साथ न सोडल्यामुळे हा निर्णय आपण घेत असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे. सोमवारी (५ मे रोजी) जे.एम. म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. यावेळी अनेक आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआघाडीसोबत राहून शेकापचे नुकसान होत आहे. उरणमधून प्रितम म्हात्रे यांना महाआघाडीतील घटक पक्षामुळेच झाल्याचे म्हात्रे यांचे मत आहे. त्यामुळे महाआघाडीतून शेकापने बाहेर पडावे, असा आग्रह जे.एम. म्हात्रे यांचा होता.
यावेळी जे. एम. म्हात्रे यांच्यासोबत त्यांचे पुत्र प्रितम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष अनुराधा मोकल, शेकापचे जिल्हा चिटणीस गणेश कडू, माजी नगरसेवक सुनील बहिरा यांच्यासह कार्यालयीन चिटणीस जितेंद्र म्हात्रे, रवींद्र भगत, प्रीती जॉर्ज-म्हात्रे, पुष्पलता मढवी, सारिका म्हात्रे, सुरेखा मोहोकर, उद्योगपती हरिश्चन्द्रसिंग सग्गु, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, विलास मोहकर, युवानेते जॉर्ज, एल.टी. पाटील आदी उपस्थित होते. पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यात जे. एम. म्हात्रे यांचा दांडगा जनसंपर्क आहे. शिवाय कुठल्याही पदासाठी पुढे न करणारे आणि पक्षाच्या कामात कायम झोकून देणारे जे. एम. म्हात्रे यांनी शेकाप सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्याने शेकापने पनवेल-उरणमधून मोठा जनाधार गमावल्याची चर्चा आहे.
जे. एम. म्हात्रे यांनी पक्षाच्या नेत्यांकडे आपली खंत बोलूनही दाखवली होती. मात्र त्यांना अपेक्षित उत्तर न मिळाल्यामुळे ते नाराज होते. रविवारीच त्यांनी आपण शेकापमध्येच असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र दुसर्याच दिवशी म्हणजे सोमवारी त्यांनी भाजपमध्ये जात असल्याचे सांगण्यासाठी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे म्हात्रे आणि शेकाप यांच्यात एका रात्रीत नेमके काय घडले? याची चर्चा सुरु झाली आहे.
पनवेलमधून यापूर्वीच रामशेठ ठाकूर यांनी शेकापचा निम्मा पक्ष खालसा केला होता. मधल्या काळात कर्नाळा बँक घोटाळ्यात अडकल्याने विवेक पाटील यांनी जेलमधून राजकीय सन्यास घेतला. बाळाराम पाटील यांच्या पराभवानंतर शेकापला पुन्हा एकदा धक्का बसला होता. आता पक्षाचे महत्वाचे नेते असलेले जे.एम. म्हात्रे आणि त्यांचे पूत्र प्रितम यांनीही शेकापला अखेरचा लाल सलाम केला आहे. अलिबाग तालुक्यात पाटील कुटुंबातच फूट पडली. माजी आमदार पंडित पाटीलआणि त्यांच्या कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पनवेलमधील दोन महत्वाच्या नेत्यांनी शेकापला सोडले आहे. त्यामुळे पनवेलमध्ये उरली सुरली शेकाप अक्षरशः गुडघ्यावर आली आहे.
शेतकरी कामगार पक्षामध्ये २००४ पूर्वी माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांची मैत्री सर्वश्रुत होती. व्यवसायामध्येही त्यांनी अनेक ठिकाणी एकत्र काम केले. म्हात्रे नगराध्यक्ष असताना चार वर्षे ते सोबत होते. दरम्यान २००६ ला ‘ठाकूर विरुद्ध म्हात्रे’ असा सामना नगरपरिषदेच्या निवडणुकीत झाला. त्या ठिकाणी झालेला पराभव काही प्रमाणात म्हात्रे यांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर दोन दशके राजकीय दृष्ट्या वेगळे असलेल्या दोन जुन्या मित्रांची जे.एम.म्हात्रे यांनी भाजपमध्ये काम करण्याचे ठरवल्यानंतर आता पुन्हा खर्या अर्थाने युती होणार आहे.

