(मुंबई / बारामती)
राज्यातील सुमारे 56 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरण्याची शक्यता असून या निर्णयामुळे राज्य सरकारवर 40 हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक भार पडू शकतो, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय (दत्ता) भरणे यांनी दिली. जुलै महिन्याच्या अखेरीस कर्जमाफीला अंतिम मंजुरी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इंदापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
राज्यपालांची स्वाक्षरी एक-दोन दिवसांत
कृषिमंत्री भरणे म्हणाले की, राज्य सरकारने यापूर्वी 30 जूनपर्यंत निर्णयाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागत असल्याने निर्णयाला काही दिवसांचा विलंब झाला आहे. राज्यपालांची स्वाक्षरी एक-दोन दिवसांत होण्याची अपेक्षा आहे. तसेच, आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारकडून मागविण्यात आली असून त्यास मंजुरी मिळाली आहे. ही यादी राज्य सरकारला पुढील काही दिवसांत प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचा अंतिम आकडा निश्चित होईल. त्यामुळे अंतिम निर्णयास आणखी चार ते आठ दिवस लागू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती योजनेतील दोन महत्त्वाच्या अटी शिथिल केल्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आणि कर्जमाफीची रक्कम दोन्ही वाढणार असल्याचे भरणे यांनी सांगितले. त्यामुळे जुलैअखेर किंवा त्यापूर्वीच कर्जमाफीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ₹50 हजारांचे प्रोत्साहन
कर्जमाफीवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना भरणे म्हणाले, “हे सरकार शेतकरी हिताचे सरकार आहे. निर्णयाला विलंब होत असला तरी तो अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठीच आहे.” नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाचा निर्णय कायम असल्याची त्यांनी पुनरुच्चार केला. तसेच काही प्रकरणांमध्ये कर्जमाफीची मर्यादाही वाढविण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई
राज्यात बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला असला तरी काही भागात पेरण्या अद्याप सुरू आहेत. सोयाबीन बियाण्यांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. निकृष्ट किंवा चुकीचे बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषिमंत्र्यांनी दिला. गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण नाही
राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना भरणे म्हणाले की, ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त ताण आलेला नाही. ही योजना महिलांना आर्थिक आधार देत असून त्याचे सकारात्मक परिणाम कुटुंबांवर दिसून येत आहेत.
महिलांच्या नावावर अद्याप मोठ्या प्रमाणात शेतीची नोंद नसल्याचे सांगत त्यांनी महिलांना जमिनीची नोंद स्वतःच्या नावावर करण्याचे आवाहन केले. महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले.
स्वर्गीय अजितदादांच्या आठवणींना उजाळा
बारामतीतील पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना दत्ता भरणे भावूक झाले. “अजितदादा हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव धावून जाणारे नेतृत्व होते. छोट्या कार्यकर्त्यापासून सामान्य नागरिकापर्यंत प्रत्येकाचे काम स्वतःच्या जबाबदारीवर करणारा नेता आज आपल्यात नाही. त्यांच्या जाण्याची उणीव कायम जाणवत राहील,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

