(मुंबई)
राज्यातील ग्रामीण सार्वजनिक वाहतुकीत एसटीच्या बसेस आता नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. शिवशाही आणि शिवनेरीच्या परंपरेनंतर, एसटी महामंडळाने नवीन बसेस ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
राज्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या नव्या बसेस 3 बाय 2 आसन रचनेच्या 55 आसनी क्षमतासह येणार आहेत, ज्यामुळे गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागू नये. मार्च 2026 पासून टप्प्याटप्प्याने राज्यभर या बसेस सेवा सुरू करतील. भगव्या-पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राच्या परंपरेचे प्रतीक ठरणार आहेत.
मंत्री सरनाईक म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे उभ्या राहिलेल्या राजमाता जिजाऊ या प्रेरणास्थान आहेत. त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या स्मरणार्थ एसटीच्या या नव्या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण करण्यात आले आहे.” यापूर्वी एसटीच्या बसेस शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी ओळखल्या जात होत्या, आता या परंपरेत आणखी एका गौरवशाली नावाची भर पडली आहे.
सध्याच्या अनेक एसटी बसेसमध्ये सुमारे 40 प्रवाशांची आसन क्षमता असते, मात्र नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेसमध्ये 55 प्रवासी आरामात बसू शकतील. त्यामुळे गर्दीच्या मार्गांवर उभ्या राहणाऱ्या सुमारे 15 प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसटी महामंडळाचे नियोजन दोन शहरांदरम्यान अतिगर्दीच्या मार्गांवर या बसेस सुरू करण्याचे आहे.
या नव्या बसेस केवळ नामकरणापुरती मर्यादित नाहीत, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरामदायी प्रवासासाठी आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये मजबूत सीट्स, आरामदायी आसन रचना, हँडलेस ग्रॅब्स आणि प्रवाशांच्या सोयीसाठी डिझाइन केलेले इंटीरियर्स समाविष्ट आहेत.
एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘राजमाता जिजाऊ’ बसेस प्रवाशांच्या गरजा समजून डिझाइन केल्या आहेत, ज्यामुळे ग्रामीण आणि उपनगरीय भागातील लोकांसाठी प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आरामदायी होईल. इतिहासाचा सन्मान आणि आधुनिक सुविधांचा संगम साधत, या बसेस लवकरच महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावतील, असे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी सांगितले.

